पक्ष्यांमधला बर्ड फ्ल्यू माणसाला होत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:24 AM2021-01-13T04:24:07+5:302021-01-13T04:24:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मुंबई, परभणी, लातूर, बीड आणि ठाणे या जिल्ह्यात व उदगीर या तालुक्यातील पक्ष्यांमध्ये बर्ड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मुंबई, परभणी, लातूर, बीड आणि ठाणे या जिल्ह्यात व उदगीर या तालुक्यातील पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू आजार आढळून आला आहे. मात्र हा आजार पक्ष्यांमधून माणासात संक्रमीत होत असल्याचे देशात एकही उदाहरण नाही. त्यामुळे घाबरण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन राज्याचे पशूसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी सांगितले. राज्यात कोंबड्यांसोबतच बगळे, कावळे, पोपट आणि चिमण्या या पक्ष्यांना बर्ड फ्लूने गाठले असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुंबई, बीड, गोंदिया, चंद्रपूर या ठिकाणी कावळे तर ठाणे, नागपूर येथे बगळे, पोपट, चिमण्या मरण पावल्याचे आढळले असल्याचे सिंग म्हणाले. या सर्व ठिकाणचे नमूने तपासण्यात आले. मुंबई, परभणी, लातूर बीड व ठाणे याठिकाणी संसर्ग आढळला आहे. मंगळवारी (दि. १२) पत्रकार परिषदेत सिंग बोलत होते. अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे, प्रयोगशाळा प्रमुख डॉ. विनायक लिमये यावेळी उपस्थित होते.
सिंग म्हणाले, “कोंबड्यांना आजार झाल्याचे आढळले त्या ठिकाणचा १० किलोमीटरचा परिघ कोंबड्यांच्या हस्तांतरणासाठी बंद करण्यात आला आहे. त्याच ठिकाणच्या १ किलोमीटर परिघातील सर्व कोंबड्या नष्ट करण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार यात कार्यवाही होत असून संबधित ठिकाणाच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्याचे अधिकार दिले आहे. बर्ड फ्लूने मृत झालेले पक्षी तसेच त्यांचा संसर्ग होऊ नये यासाठी त्या परिसरातील नष्ट केलेले पक्षी जमिनीत खोल खड्डा घेऊन त्यात पुरण्यात येतात. त्यावर चुना टाकण्यात येतो. ही शास्त्रीय पद्धत असून त्यात कोणताही धोका नाही.”
कोंबड्या पाळल्या जातात त्याठिकाणी त्यांच्याकडून अन्य पक्ष्यांना संसर्गाचा धोका असतो. त्यामुळेच बर्ड फ्लू असलेल्या ठिकाणच्या सर्व कोंबड्या नष्ट करण्यात येतात. कावळे, बगळे, पोपट किंवा चिमण्या अशा पक्ष्यांचा बाबतीतही मृत झालेले पक्षी जमिनीत खोलवर पुरण्यात येतात. त्यांच्यापासूनही अन्य पक्ष्यांना संसर्ग होण्याची भीती असते. त्यामुळे ही काळजी घेण्यात येते, असे सिंग म्हणाले.
चौकट
नमूने भोपाळला
“मृत पक्ष्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात. देशातील ती एकमेव प्रयोगशाळा आहे. तिथे तपासणी होऊन निष्कर्ष कळण्यास वेळ लागत असल्याने केंद्र सरकारने आणखी काही प्रादेशिक प्रयोगशाळा सुरू केल्या आहेत. पुण्यात अशी एक प्रयोगशाळा आहे. ही तपासणी धोकादायक असल्याने विशेष प्रयोगशाळेत ती करावी लागते. अंतीम तपासणी भोपाळलाच करावी लागते. तिथे राज्यातील काही ठिकाणचे नमुने प्रलंबित आहेत.”
- सचिंद्र प्रताप सिंग, राज्य पशुसंवर्धन आयुक्त.