पुणेकरांच्या कचऱ्यामुळे पक्ष्यांचे घर अस्वच्छ; कवडीपाट येथे दारूच्या बाटल्या, कपड्यांचा ढीग
By श्रीकिशन बलभीम काळे | Published: October 11, 2022 04:27 PM2022-10-11T16:27:36+5:302022-10-11T16:27:54+5:30
पुणेकरांनी नदीत कचरा टाकणे बंद केले, तरच ही समस्या सुटणार
पुणे : दरवर्षी पावसाळ्यातून व इतर वेळी देखील पुणेकरांनीनदीत टाकलेला कचरा कवडीपाट येथील बंधाऱ्याला अडकून तिथे कचराकुंडीचे स्वरूप येते. कवडीपाट हे दोनशेहून अधिक विविध जातींच्या पक्ष्यांचे हक्काचे घर आहे. त्या ठिकाणी पाणथळ जागा असल्याने तिथे हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर पक्षी येतात. परंतु, पुण्यातून टाकलेला कचरा तिथे साठल्याने पक्ष्यांना अन्न शोधायला कठिण जाते. शहरातील नदी पुलावरून पुणेकर कचरा टाकतात. दारूच्या रिकाम्या बाटल्या टाकल्या जातात. कपडे व इतर साहित्यही फेकून दिले जाते. त्यामुळे हे सर्व पाण्यासोबत कवडीपाटला जो दगडी बंधारा आहे, तिथे अडकते. दारूच्या बाटल्या, कपडे, ब्रश अशा वस्तूंचे खच पडलेला आहे. पुणेकरांनी नदीत कचरा टाकणे बंद केले, तरच ही समस्या सुटणार आहे.
पुणे-सोलापूर रोडवरील कवडी हे पुणे आणि परिसरातील पक्षीप्रेमींचे आवडते पक्षीनिरीक्षण केंद्र आहे. या ठिकाणी वर्षभर सुमारे २०० पेक्षा अधिक प्रजातींचे पक्षी आढळून येतात. उत्तरेकडील करकोचे, नाना प्रकारची वन्य बदके, शिकारी पक्षी, छोटे कीटक भक्षी वटवटे, यांसारखे पक्षी हजारोंच्या संख्येने दक्षिणेकडे झेपावतात. हे पक्षी हजारो किलोमीटर प्रवास करून आपल्याकडे येतात, अशी माहिती पक्षी अभ्यासक विशाल तोरडे यांनी दिली.
लवकरच हिवाळा सुरू होईल. कवडी येथे स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन होईल. या ठिकाणी चक्रवाक, भिवई, थापट्या या बदकांखेरीज दलदल ससाणा, तुतवार, पिवळाधोबी,पांढरा धोबी,राखी धोबी,पाणलावा, रफ,रक्तसुरमा,गॉडविट, शेकाट्या,नादिसूरय, यांसारख्या स्थलांतरित पक्ष्यांबरोबरच राखी बदक, चित्रबलाक, राखी बगळा, मोरबगळा, मध्यम बगळा, छोटा बगळा, वंचक, जांभळा बगळा, पांढरा शराटी, काळा शराटी, ताम्र शराटी, चमचा, रातबगळा, कंठेरी चिखल्या इत्यादी स्थलांतरित व स्थानिक स्थलांतरित पक्षी येतात.
''कवडी या पक्षी स्थळाचा विकास होण्यासाठी शासन व स्थानिकांनी पुढाकार घ्यायला हवा. या ठिकाणी वनविभागातर्फे निरीक्षण मनोरे उभारणे शक्य आहे. तसेच स्थानिक लोकांनी बोटिंगची व्यवस्था केल्यास लोकांना रोजगार मिळेलच. परंतु पलीकडच्या काठावरचं पक्षी जीवन लोकांसमोर येईल. लोकसहभाग व शासन यांच्या संयुक्त उपक्रमाणे कवडीचा विकास होईल. - विशाल तोरडे, पक्षी अभ्यासक''