पक्ष्यांचे नंदनवन कवडीपाटला फेसाळली मुठा नदी; एकीकडे कचरा, जलपर्णी, दुसरीकडे फेसच फेस
By श्रीकिशन काळे | Updated: March 21, 2024 16:04 IST2024-03-21T16:03:11+5:302024-03-21T16:04:39+5:30
पुण्यातील नदीत सांडपाणी प्रक्रिया न करताच सोडले जाते, परिणामी पुण्यापासून पुढे उजनीपर्यंत सर्व गावांना प्रदूषित पाणी मिळते

पक्ष्यांचे नंदनवन कवडीपाटला फेसाळली मुठा नदी; एकीकडे कचरा, जलपर्णी, दुसरीकडे फेसच फेस
पुणे: शहरापासून अगदी काही अंतरावर असलेल्या पक्ष्यांचे नंदनवन कवडीपाटची अवस्था बिकट झाली आहे. या ठिकाणी मुठा नदीला अक्षरश: फेस येत असून, त्यामुळे पक्षी तर केव्हाच गायब झाले आहेत. रसायनयुक्त पाणी येत असल्याने बंधाऱ्यावरून पाणी पुढे जाताना संपूर्णपणे फेसाळलेले पहायला मिळत आहे.
यंदाचा जागतिक जल दिन आज (दि.२२) साजरा होत आहे. या वर्षीची थीम ही पाणी आणि पीस अशी आहे. पाण्यामुळे शांतता पसरली पाहिजे, न की वाद, भांडण झाले पाहिजे. कारण नद्या, तलाव अनेक देशांमधून जातात. परिणामी त्यावरून वाद होऊ नये तर शांतता पसरावी ही या दिनाची थीम आहे. पुण्यातील नदीत सांडपाणी प्रक्रिया न करताच सोडले जाते. परिणामी पुण्यापासून पुढे उजनीपर्यंत सर्व गावांना प्रदूषित पाणी मिळते. त्या लोकांना पुणेकरांवर संताप येत असला तरी देखील त्यांना काही करता येत नाही. उजनीमध्ये तर प्रदूषणयुक्त पाण्यामुळे अनेक नागरिक, जनावरे यांना आजार होत आहेत. मातीही दूषित आहे.
गेल्या काही दिवसांपासून नद्या प्रदूषित झाल्याने त्या फेसाळलेल्या पहायला मिळत आहेत. इंद्रायणी येथे नुकतेच महाशीर हे अतिशय दुर्मिळ मासे त्यामुळे मरण पावले. त्यानंतर आता कवडीपाट येथे फेस दिसू लागला आहे. घराघरातून दररोज रसायनयुक्त पाणी नदीत जात असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
या विषयी पक्षी निरीक्षक, अभ्यासक हेमंत दांडेकर यांनी नुकतीच कवडीपाटला भेट दिली. तेव्हा त्यांना कवडीपाट येथील पुलाच्या एका बाजूला जलपर्णी, कचरा साठलेला दिसला, तर दुसऱ्या बाजूला फेसाळलेले पाणी वाहत असल्याचे दिसले.
कवडीपाट येथे मुळा-मुठा नदीचा जलाशय पुलाला अडतो. तिथे पाणथळ जागा आहे. त्यावर चक्रवाक, भिवई, थापट्या या बदकांबरोबर दलदल ससाणा, तुतवार, पिवळा धोबी, पांढरा धोबी, राखी धोबी, पाणलावा, रफ, रक्तसुरमा, गॉडविट, नामा, शेकाट्या, नदीसूरय असे पक्षी येतात. तसेच स्थलांतरित पक्ष्यांबरोबरच राखी बदक, चित्रबलाक, राखी बगळा, मोरबगळा, मध्यम बगळा, छोटा बगळा, वंचक, कंठेरी चिखल्या पहायला मिळतात. पण आता पाणी प्रदूषित असल्याने खूप फेस आलेला आहे. पुण्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया केली तर हा फेस येणार नाही. - विशाल तोरडे, संचालक, 'निसर्गायात्री' पर्यावरण प्रेमी संस्था व पक्षी अभ्यासक