२ तासापूर्वीचा जन्म; तिने अनुभवल्या वेदना, माणुसकीच्या प्रयत्नांची पराकाष्ठा अन् मिळाले जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 04:59 PM2023-12-19T16:59:15+5:302023-12-19T16:59:58+5:30
इंदापूरात अज्ञात स्त्रीने २ तासापूर्वी जन्मलेले स्त्री अर्भक रस्त्यालगत असणाऱ्या चारीत टाकून दिले होते
इंदापूर : अवघ्या दोन तासांपूर्वी जन्मलेल्या स्त्री अर्भकाला पोलीस यंत्रणा, उपजिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी तीन तास प्रयत्नांची पराकाष्ठा करुन जीवनदान दिले. ती सुखरुप आहे. सोलापूरमध्ये पुढचे उपचार घेत आहे.
ही शनिवारच्या ( दि.१६) रात्रीची कथा आहे. बिजवडी गावच्या हद्दीत वनविभागाच्या क्षेत्रातील कच्च्या रस्त्यालगत असणा-या चारीत रात्रीच्या आठ वाजण्याच्या सुमारास,दोन तासांपूर्वी जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक आढळले. अज्ञात स्त्रीने ते अर्भक उघड्यावर टाकून दिले होते. त्या स्त्रीविरुध्द त्याच गावात राहणाऱ्या बापु ज्ञानदेव पालवे या तरुणाने फिर्याद दिली. त्या नुसार गुन्हा दाखल करुन सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शिताप यांना पोलीसांनी घटनास्थळी बोलावून घेतले.
त्या अर्भकाला उपजिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. तेथे अंजली साबळे उज्वला कदम कस्तुरी शिदापुरे, डॉ.ज्योती लांघी, डॉ. विनोद राजपूरे यांनी त्या अर्भकाला चिकटलेले गवत, घुसलेले काटे, माती खडे काढून स्वच्छ केले.डॉ. विनोद राजपूरे यांनी अडीच तास एकाच जागी उभा राहून सक्शन मशीनने अर्भकाच्या शरीरातील सारी घाण काढून टाकली व ऑक्सिजन लावला. डॉ.सुहास सातपुते यांनी उपचार करुन अर्भकाला सामान्य स्थितीत आणले. दरम्यानच्या काळात फौजदार सुधीर पाडुळे, हवालदार माधुरी लडकत, प्रशांत शिताप यांनी दुध पावडर, शाली, दुपटी आणून त्या अर्भकाला उब दिली. चांगल्या उपचारासाठी त्याला सोलापूरला पाठवण्याचा निर्णय झाला. रात्री अकरा वाजता हवालदार माधुरी लडकत, सामाजिक कार्यकर्त्या वंदना कांबळे यांनी रुग्णवाहिकेतून तिला सोलापूरमध्ये नेले. दोन वाजता तिकडे उपचार सुरु झाले.