स्फूर्ती आणि अभिव्यक्तीतूनच साहित्याचा जन्म : प्रा. मिलिंद जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:09 AM2021-07-26T04:09:28+5:302021-07-26T04:09:28+5:30
पुणे : "स्फूर्ती आणि अभिव्यक्तीतूनच साहित्याचा जन्म होत असतो. शब्दांच्या पाठीशी अनुभवाचे संचित उभे केल्यानंतर शब्दांना खरा अर्थ ...
पुणे : "स्फूर्ती आणि अभिव्यक्तीतूनच साहित्याचा जन्म होत असतो. शब्दांच्या पाठीशी अनुभवाचे संचित उभे केल्यानंतर शब्दांना खरा अर्थ प्राप्त होतो," असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
पूजा सामंत आणि सिया सामंत या मायलेकींनी लिहिलेल्या 'ओंजळीतलं चांदणं' या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून टाटा मोटर्समधील कलासागर या मासिकाचे संपादक सुधीर हसमनीस आणि सिम्बायोसिस स्कूलच्या प्राचार्या वीणा हवनूरकर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक आचार्य डॉ. माधव पोतदार होते.
या वेळी प्रा. जोशी म्हणाले, मायलेकींनी शब्दांतून मांडलेला हा आत्मस्वर वाचनीय आहे. लेखन ही सोपी गोष्ट नाही. केवळ शब्द आहेत म्हणून लेखन करता येत नाही. त्याला प्रतिभेचा आणि अनुभवाचा स्पर्श लागतो.
डॉ. पोतदार म्हणाले, या पुस्तकातून आंतरिक आत्मीयतेचा स्वर व्यक्त होताना दिसतो. रोजच्या सहज जगण्यातील अनुभवातून साकारलेले आहे. मराठी भाषेचा अभिमान आणि भावबंध त्यातून प्रकट होताना दिसतो.
सुधीर हसमनीस आणि वीणा हवनूरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. लेखिका म्हणून पूजा आणि सिया सामंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शब्दसारथीचे संचालक पराग पोतदार यांनी केले. डॉ. विनया केसकर यांनी सूत्रसंचालन केले. पराग सामंत यांनी आभार मानले.
--------------------------
फोटो ओळी
: ओंजळीतलं चांदणं या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी (डावीकडून) सिया सामंत, वीणा हवनूरकर, सुधीर हसमनीस, डॉ. माधव पोतदार, प्रा. मिलिंद जोशी, पूजा सामंत, पराग पोतदार.