लॉकडाऊन काळात शहरातील जन्मदर घटला, मृत्यूदरात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:10 AM2021-03-25T04:10:04+5:302021-03-25T04:10:04+5:30
कोरोना आजाराच्या साथीने २०२० हे वर्ष संकटाचे वर्ष ठरले. या काळात जन्मदराच्या तुलनेत मृत्यूदर कमालीचा वाढल्याचे समोर आले आहे. ...
कोरोना आजाराच्या साथीने २०२० हे वर्ष संकटाचे वर्ष ठरले. या काळात जन्मदराच्या तुलनेत मृत्यूदर कमालीचा वाढल्याचे समोर आले आहे. या वर्षात जिल्ह्यात सुमारे १,३५,००० बालकांचा जन्म झाल्याची नोंद आहे. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये जन्मसंख्येत १००० ने वाढ झाली. तर, मृत्यूसंख्येमध्ये तबबल १६ हजारांची वाढ झाली आहे.
पुणे महापालिका हद्दीत २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये जन्म २००० नी घटले, तर मृत्यूसंख्येत ६ हजारांनी वाढ झाली आहे. या वर्षात लॉकडाऊनमुळे अपघातांची संख्या कमी झाली असली, तरी साथीच्या आजाराने अनेकांचा बळी घेतला.
२०२० मध्ये शहरात २५९६७ मुलांचा, तर २४,५७७ मुलींचा जन्म झाला. जुलै महिन्यात जन्मसंख्या सर्वात कमी म्हणजे २६१२ इतकी होती, तर सर्वाधिक जन्म नोव्हेंबर महिन्यात झाले. शहरात २०२० या वर्षात २१७५६ पुरुषांचा, तर १६,४३८ महिलांचा मृत्यू झाला.
वर्षभरात सर्वात कमी मृत्यू मार्च महिन्यात (१७१२) तर सर्वाधिक मृत्यू ऑक्टोबर महिन्यात (४४२६) झाले.
-------
शहरी भागात जन्मदर कमी झाला, ग्रामीण भागात वाढ
जिल्हा परिषदेकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार शहरातील जन्मदरात घट झाली, तर ग्रामीण भागातील जन्मदर वाढला. शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात मृत्यूदर मात्र कमालीचा वाढल्याचे निदर्शनास आले आहे.
--------
जिल्हा
वर्ष जन्म मृत्यू
२०१८ १,४३,४१४ ५१,८२४
२०१९ १,३३,८१७ ६३६३०
२०२० १,३४,९९८ ७९६३३
-----------
शहर
जन्म मृत्यू
२०१८ ५५,५१६ ३१५७०
२०१९ ५२,६६९ ३२,३५३
२०२० ५०,५४४ ३८,१९४