वाढदिवसाचे केक तलवार, रेम्बो चाकूने कापत फोटो व्हाटस ॲपवर टाकणं पडलं महागात; दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 08:37 PM2021-07-28T20:37:13+5:302021-07-28T20:44:30+5:30
रात्रीच्या वेळी चौकामध्ये गर्दी करुन तलवार, रेम्बो चाकूने केक कापून गोंधळ घालतात. त्याचे फोटो व्हॉटसॲपवर टाकून परिसरात दहशत निर्माण करत आहेत.
पुणे : वाढदिवसाचा केक तलवारीने कापून तो फोटो व्हाटसॲपवर टाकणाऱ्यास गुन्हे शाखेच्या युनिट १च्या पथकाने तलवारीसह पकडले.
दत्तात्रय लक्ष्मण धनकवडे (वय ४२, रा. दत्तप्रसाद अपार्टमेंट, धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
रात्रीच्या वेळी चौकामध्ये गर्दी करुन तलवार, रेम्बो चाकूने केक कापून गोंधळ घालतात. त्याचे फोटो व्हॉटसॲपवर टाकून परिसरात दहशत निर्माण करतात. त्यांच्यावर आळा बसविण्यासाठी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी गुन्हे शाखेला दिले आहेत.
दत्तात्रय धनकवडे याने ९ एप्रिल रोजी स्वत:चे वाढदिवसाच्या दिवशी तलवार हातात घेऊन केक कापला असून त्याचा फोटो व्हाटसॲपवर टाकला होता. पोलीस अंमलदार अमोल पवार यांना दत्तात्रय धनकवडे हा तलवारीसह घराच्या खालील चौकात उभा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे जाऊन धनकवडे याला पकडले. त्याची झडती घेतली असता शर्टच्या आत लपवून ठेवलेली तलवार मिळून आली. सहकारनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
टिपू ऊर्फ सलमान इम्तियाज शेख (वय ३०, रा. न्यू मंगळवार पेठ) याने २५ जुलै रोजी आपल्या वाढदिवशी रेम्बो चाकूने केक कापून ताे फोटो आपल्या व्हाटसॲपवर ठेवला होता. पोलीस अंमलदार इ्म्रान शेख यांना टिपू हा साई हेरीटेज हॉटेलजवळ उभा असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती देऊन पोलीस पथकाने टिपूला पकडून त्याच्याकडून रेम्बो चाकू जप्त केला आहे. समर्थ पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.