वाढदिवस ठरला शेवटचा दिवस; दुचाकीस्वाराच्या अपघातात ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 07:08 PM2022-10-10T19:08:33+5:302022-10-10T19:08:53+5:30
रविवारी चिमुकल्याचा वाढदिवस होता तोच त्याचा शेवटचा दिवस ठरला
बारामती : भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वारामुळे आईसमवेत जाणाऱ्या एका चिमुकल्याचा रविवारी(दि ९) रात्री ९ च्या सुमारास अपघाती मृत्यु झाला. अरहत प्रमोद थोरात (वय ३,रा.मळद,ता.बारामती) असे या चिमुकल्याचे नाव आहे. रविवारी अरहतचा वाढदिवस होता. तोच त्याचा शेवटचा दिवस देखील ठरला आहे. या घटनेने थोरात कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी शहर पोलिसांनी संकेत प्रकाश खळदकर (रा. नानगाव, ता. दौंड) या दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांत शुभांगी प्रकाश कांबळे (रा. सटवाजीनगर, बारामती) यांनी फिर्याद दिली. अरहत याची आई प्रिती या फिर्यादीच्या भाची आहेत. अरहत याचा रविवारी वाढदिवस असल्याने ते कुटंबिय कांबळे यांच्याकडे आले होते.
रविवारी(दि. ९) रात्री साडे नऊच्या सुमारास ते मेळाव्यानिमित्त आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे आयोजित गाण्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी निघाले होते. फियार्दीच्या हाताला धरून अरहत हा चालत निघाला होता. यावेळी रस्त्यावर असणारे एक लोखंडी बॅरिकेटस ओलांडून ते पुढे जाताना भरधाव वेगाने एक दुचाकीस्वार आला. दुचाकीला जोरदार धडक दिल्याने बॅरिकेटस उडून फिर्यादीच्या हाताला लागले. हाताला धरून चालणाऱ्या अरहत याच्या डोक्याला लागून तो उडून पडला. त्याच्या डोक्यातून रक्त येऊन तो गंभीर जखमी झाला. येथील इंदापूर रस्त्यावरील जय शिवम हॉटेलसमोर ही दुदैवी घटना घडली.
अपघातानंतर देखील अरहत शुद्धीवर होता. कुटुंबियांनी त्याला तात्काळ बारामतीतील चार वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये नेल्याचे समजते. मात्र, अपघाताचे रुग्ण घेत नसल्याचे सांगत त्याला उपचारासाठी दाखल करण्यास सबंधित रुग्णालयांनी नकार दिल्याची माहिती मिळत आहे. येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यास उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरांनी ऊशीर झाल्याचे सांगत त्यास मृत घोषित केले.