बिटकॉइन गैरव्यवहार प्रकरण: रवींद्र पाटील व पंकज घोडे यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 12:41 PM2022-06-08T12:41:44+5:302022-06-08T12:43:28+5:30
पुणे सायबर पोलिसांनी सोमवारी साडेचार हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले...
पुणे :बिटकॉइन या आभासी चलनात गुंतवणूक करण्याच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल झाल्यानंतर, मदत घेण्यात आलेल्या माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ प्रभाकर पाटील व सायबर तज्ज्ञ पंकज घोडे यांनी आरोपींच्या डेटाचा गैरवापर करून परस्पर बिटकॉइन लाटल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात पुणे सायबर पोलिसांनी सोमवारी साडेचार हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांच्या न्यायालयात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. पाटील याच्याकडून आतापर्यंत चौतीस प्रकारची साडेसहा कोटी रुपये क्रिप्टोकरन्सी जप्त करण्यात आली आहे. पाटील याने आपले कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या नावे क्रिप्टोकरन्सीचे वॉलेट काढले होते. त्यामध्ये आरोपीच्या खात्यातून बिटकॉइन वर्ग केले होते, असे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पाटील याच्यासह त्याची पत्नी कांचन पाटील आणि भाऊ अमरनाथ पाटील यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.
बिटकॉइन या आभासी चलनात गुंतवणूक करण्याच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे दोन गुन्हे २०१८ मध्ये दत्तवाडी व निगडी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. या दोघांनी आरोपींच्या डेटाचा गैरवापर करून परस्पर बिटकॉइन लाटल्याचे निदर्शनास आले होते.
कोण आहे रवींद्र पाटील
रवींद्र पाटीलने २००२ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्याला जम्मू-काश्मीर पोलीस प्रशासनात काम करण्याची संधी मिळाली. मात्र, अल्पावधीत राजीनामा देत तो ‘केपीएमजी’ या कंपनीत तो कार्यरत होता. पुणे पोलिसांसाठी सायबरतज्ज्ञ म्हणून काम करताना त्याने आरोपीच्या खात्यातील २३६ बिटकॉइन परस्पर इतर खात्यात वळविले आणि आरोपीच्या खात्यात कमी बिटकॉइन असल्याचे स्क्रीनशॉट दाखविले होते, असे केवायसी अहवालातून स्पष्ट झाले आहे.
कोण आहे पंकज घोडे
सायबरतज्ज्ञ पंकज घोडे हा ग्लोबल ब्लॉकचेन फाउंडेशन कंपनीचा संचालक होता. पोलिसांसोबत काम करताना त्यानेही आरोपींच्या खात्यातील बिटकॉइन इतर खात्यात वळवून फसवणूक केली. त्याच्या क्रिप्टोकरन्सी वॉलेटच्या तपासणीत त्याने हजारो युरो, डॉलरचे परदेशी व्यवहार केल्याचे निदर्शनास आले आहे.