गुन्ह्यात पोलिसांना मदत करणाऱ्या निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यानेच हडपले Bitcoin

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 08:37 PM2022-03-12T20:37:49+5:302022-03-12T20:43:26+5:30

अधिक तपासासाठी न्यायालयाने दोघांना १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी...

bitcoin seized by retired ips officer who assisted police in crime pune police | गुन्ह्यात पोलिसांना मदत करणाऱ्या निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यानेच हडपले Bitcoin

गुन्ह्यात पोलिसांना मदत करणाऱ्या निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यानेच हडपले Bitcoin

Next

पुणे : संपूर्ण देशात गाजलेल्या क्रिप्टो करन्सीच्या फसवणूकीत (cryptocurrency fraud) पोलिसांनी मदतीसाठी घेतलेल्या संगणकतज्ञ आणि स्वेच्छानिवृत्ती घेऊन कंपनी सुरु केलेल्या आयपीएस अधिकाऱ्याने आरोपींच्या क्रिप्टो खात्यातून सुमारे २० कोटी रुपये किंमतीचे बिटकॉईन, इथर परस्पर हडप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सायबर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. संगणकतज्ञ पंकज प्रकाश घोडे (वय ३८, रा. ताडीवाला रोड) आणि सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रवींद्रनाथ प्रभाकर पाटील (वय ४५, रा. बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबतची माहिती अशी, बिटकॉइनमध्ये आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून अमित भारद्वाज व विवेककुमार भारद्वाज यांनी सुमारे साडेचारशे जणांचे कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली होती. दत्तवाडी व भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. यावेळी बिटकॉईनबाबत पोलिसांना पुरेशी माहिती नसल्याने त्यांनी संगणकतज्ञ पंकज घोडे यांची मदत घेतली होती. यावेळी पोलिसांनी भारद्वाज याचे क्रिप्टो खाते गोठवले होते.

यावेळी पंकज घोडे याने जप्त केलेले क्रिप्टो एक्सचेंजच्या वॉलेटमधून क्रिप्टो करन्सीचे ब्लॉकचेनचे बनावट स्क्रीनशॉट खरे असल्याचे भासवून तपासासाठी सादर केले. तसेच आरोपींचे जप्त केलेल्या वॉलेटबाबत खोटी माहिती देऊन गुन्ह्याच्या तपासाची दिशाभूल केली. घोडे याच्यानंतर पोलिसांनी रवींद्रनाथ पाटील याची मदत घेतली. त्याने आरोपी व त्यांच्या साथीदारांचे विविध क्रिप्टो एक्सचेंजच्या वॉलेटमधून क्रिप्टो करन्सी, स्वत:चे तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या वॉलेटमध्ये परस्पर वळवून घेतले.

आरोपींकडून क्रिप्टो करन्सी जप्त करताना संगणकतज्ञांनी संशयास्पद भूमिका निभावल्याचा संशय राज्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे अपर पोलीस महासंचालकांना आला. त्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्या चौकशीत तांत्रिक पुराव्यावरुन त्यांचे के वाय सी वरुन या दोघांनी परस्पर क्रिप्टो करन्सी वळविल्याचे उघड झाले. त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. अधिक तपासासाठी न्यायालयाने दोघांना १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.

आरोपींच्या घरी, ऑफिस व नातेवाईकांच्या घरी झडती व जप्ती करवाई करण्यात आली आहे. त्यात मोबाईल, मॅकबुक, हार्ड डिस्क, टॅब, लॅपटॉप, सिडी, पेन्ड्राईव्ह, मेमरी कार्ड, स्मार्ट वॉच, हॉटस्पॉट, सीडी, इंटरनेट डोंगल अशा विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

Web Title: bitcoin seized by retired ips officer who assisted police in crime pune police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.