उरुळी कांचन येथे डुकरांचा नागरिकांना चावा
By admin | Published: May 3, 2017 01:53 AM2017-05-03T01:53:03+5:302017-05-03T01:53:03+5:30
उरुळी कांचन येथे डुकरांचा नागरिकांना त्रास सुरू असून रविवारी महादेव मंदिर परिसरातील सुमारे दहा - बारा नागरिकांना या
उरुळी कांचन : उरुळी कांचन येथे डुकरांचा नागरिकांना त्रास सुरू असून रविवारी महादेव मंदिर परिसरातील सुमारे दहा - बारा नागरिकांना या डुकरांनी चावा घेऊन जखमी केले असून या डुकरांचा ग्रामपंचायतीने ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी माजी सरपंच दत्तात्रय कांचन यांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे.
याबाबत माहिती अशी : महादेव मंदिर परिसरात एक जुने घर पाडल्याने तेथे पडलेल्या माती व दगडांच्या ढिगावर या डुकरांच्या कळपाने आपला रहिवास केला. यातील एक डुक्कर व्यायल्याने तिने या परिसरात राहणाऱ्या व मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर आपली दहशत निर्माण करून इतर डुकरांच्या साहाय्याने त्यांच्यावर हल्ला करून चावून जखमी करण्याचा सपाटाच लावला आहे. याबाबत स्थानिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन तक्रार केली. केवळ डुकराच्या मालकाला त्याची कल्पना दिली आहे, असे उत्तर देऊन तक्रारकर्त्यांची बोळवण केली गेली. रविवार हा आठवडेबाजाराचा दिवस सर्वत्र नागरिकांची वाढलेली वर्दळ व गर्दी, या वेळीही या डुकरांनी कहरच केला व जवळपास दहा - बारा लहानमोठ्या नागरिकांना चावून जखमी केले. सोमवारी महाराष्ट्र दिनी असलेल्या ग्रामसभेत या विषयाला विशेषत: या भागातील महिलांनी वाचा फोडून सरपंच अश्विनी कांचन व ग्रामविकास अधिकारी के. जी. कोळी यांना चांगलेच फैलावर घेतले. ग्रामविकास अधिकारी कोळी यांनी आज या डुकरांचा बंदोबस्त केल्याशिवाय सुटी असली तरी घरी जाणार नाही, असे आश्वासन दिल्यावर या महिला शांत झाल्या.