बिवरी गावानंच जोडला विकासाचा सेतू
By Admin | Published: October 19, 2015 01:55 AM2015-10-19T01:55:17+5:302015-10-19T01:55:17+5:30
पूल नसल्याने पुण्याला जाताना १५ किलोमीटरचा वळसा मारून जावे लागत होेते. ‘सरकारी काम आणि नुसतंच थांब’ याची खात्री असल्याने शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता गावानंच
राजेवाडी : पूल नसल्याने पुण्याला जाताना १५ किलोमीटरचा वळसा मारून जावे लागत होेते. ‘सरकारी काम आणि नुसतंच थांब’ याची खात्री असल्याने शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता गावानंच पूल बांधण्यासाठी कंबर कसली. सर्वांच्या अथक परिश्रमांतून अर्धा किलोमीटरचा पूल बांधला. हवेली तालुक्यातील बिवरी या छोट्याशा गावाने बांधिलकीतून विकासाचा आदर्श उभा केला आहे.
बिवरीहून पुण्याकडे जाण्यासाठी ग्रामस्थांना कोरगाव मूळमार्गे उरुळी कांचनहून नायगावमार्गे पुण्याला जावे लागत असे. त्यासाठी १५ किलोमीटर अंतराचा वळसा मारून जावे लागत होते. अनेकांना ये-जा करताना वेळ, पैसा घालवावा लागत होता. त्यामुळे गावातील तसेच पंचक्रोशीतील नागरिकांसाठी नदीवर पूल बांधावा, अशी कल्पना ग्रामस्थांच्या मनात आली.
दत्तात्रय गोते यांनी पुलाची कल्पना गावातील तरुण व नागरिकांसमोर मांडली. सर्वांनी प्रतिसाद दिला. कोणत्याही सरकारी मदतीशिवाय सर्वांनी जवळपास अर्धा किलोमीटर लांबीच्या पुलाचे काम करण्याचे ठरविले व सर्वांनी तन-मन-धनाने अहोरात्र मेहनत करून हा पूल साकारला.
गोते पाटील मित्रपरिवाराने २५ लाख रुपये खर्च करून आर्थिक मदतीचा सढळ हात दिला. शिरूर हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या हस्ते उद्घाटन करून त्याचे लोकार्पण करण्यात आले. अध्यक्षस्थानी भाजपाचे नेते दादापाटील सातव होते.
या वेळी भारतीय जनपा पार्टीचे तालुकाध्यक्ष गणेश कुटे, दत्तात्रय गोते पाटील मित्र परिवारातील अमित गोते, माऊली गोते, शरद गोते, राहुल जवळकर, महेंद्र झेंडे, अजय गोते, प्रशांत गोते, दीपक गोते, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी गोते, बाळासाहेब गोते, विशाल गुळमे, निखिल गोते, संजय रघुवंत, बाळासाहेब जगताप,
अविनाश गायकवाड, वाल्मीक गोते, तुषार गोते, उद्योजक नितीन गोते यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुदाम गोते यांनी प्रास्ताविक केले. वसुंधराचे अध्यक्ष विलास गोते यांनी आभार मानले. (वार्ताहर)