स्मृती इराणींच्या कार्यक्रमात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 07:15 PM2022-05-16T19:15:29+5:302022-05-16T19:43:46+5:30
राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यां पोलिसांच्या ताब्यात
पुणे : बालगंधर्व सभागृह येथील केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालणार्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी सध्या कडेकोट बंदोबस्त आहे. कार्यक्रमासाठी बालगंधर्व सभागृहात स्मृती इराणींचा सत्कार सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या गोंधळ घालणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. आता या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या महिला सभागृत कशा आल्या?
ही अत्यंत वाईट घटना आहे. एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मंत्री स्मृती इराणी आल्या असताना असा गोंधळ घालणे एकदम चुकीचे आहे. महिलांना पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस घाणेरडे राजकारण करत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना या महिला कार्यक्रमात कशा आल्या हा प्रश्न भाजपकडून विचारला जातोय.
मारहाणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण झाल्यानंतर पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक झालाचे दिसत आहे. "मोदी सरकार हाय...मोदी सरकार मुर्दाबाद" अशा घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या.
राष्ट्रवादीचे षडयंत्र- भाजप
केंद्रीय मंत्र्यांचा कार्यक्रम असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या कार्यक्रमस्थळी कशा आल्या हा प्रश्न निर्माण होतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे हे एक षडयंत्र असल्याचेही भाजपकडून सांगण्यात आले. अमित शाह आणि भाजपाची वाटचाल” या मराठीत अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते आज बालगंधर्व सभागृहात पार पडला.