आमदार भास्कर जाधवांच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक! पुण्यात 'जोडे मारो' आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 02:22 PM2021-07-26T14:22:03+5:302021-07-26T14:22:23+5:30
''चले जाव चले जाव भास्कर जाधव चले जाव, महिलांचा अपमान करणाऱ्या भास्कर जाधव चा धिक्कार असो'' अशी घोषणाबाजी
पुणे: ''चले जाव चले जाव भास्कर जाधव चले जाव, महिलांचा अपमान करणाऱ्या भास्कर जाधव चा धिक्कार असो'' अशी घोषणाबाजी करत पुण्यात भाजपच्या वतीने भास्कर जाधव यांच्या वक्तव्याविरोधात खंडूजी बाबा चौक येथे जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चिपळूण दौऱ्यादरम्यान एका महिलेने आमदांराचा २ महिन्याचा पगार फिरवा आणि आम्हाला नुकसान भरपाई द्या. अशी मागणी केली होती. ''आमदार 5 महिन्यांचा पगार देतील पण त्याने काहीही होणार नाही, बाकी काय, तुमचा मुलगा कुठयं, अरे आईला समजव, उद्या ये'' असे अरेरावीच्या भाषेतले उत्तर ठाकरे यांच्याबरोबर उपस्थित असणाऱ्या आमदार भास्कर जाधव यांनी दिले होते. जाधव यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे राजकीय वातवरण ढवळून निघाले आहे. तसेच त्यांच्यावर सर्व माध्यमातून टीकाही होऊ लागली आहे. त्याचे पडसाद राज्यात सर्व ठिकाणी उमटू लागले आहे. पुण्यातही त्यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
चिपळूणमधील पूरस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. दरम्यान चिपळून दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यानी पुरग्रस्तांशी सवांद साधला. यावेळी एका पुरग्रस्त महिलेनं आक्रोश व्यक्त करत मुख्यमंत्र्याकडे मदतीची याचना केली. त्यानंतर भास्कर जाधव यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर सर्व माध्यामतून त्यांच्यवर टीका होत आहे.