पक्ष म्हणून भाजपचा आंदोलनाला, आरक्षणाला कायम पाठिंबा; रावसाहेब दानवे यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 12:06 PM2023-10-29T12:06:12+5:302023-10-29T12:06:39+5:30
राज्यभर आरक्षणावरून आंदोलन पेटलेले असताना सरकार मराठ्यांना आरक्षण देईलच
पुणे : राज्यभर मराठा आंदोलनावरून वातावरण पेटलेले असताना राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देईलच, असा पुनरुच्चार रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. पक्ष म्हणून भाजपचा आंदोलनाला, आरक्षणाला कायम पाठिंबा आहे. आरक्षण हा मराठ्यांचा अधिकार आहे, असा दावाही दानवे यांनी केला आहे. आरक्षणावरून नेत्यांना गावबंदी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मराठ्यांच्या आरक्षणाबाबतच्या भावना तीव्र असल्याने त्याबाबत आम्ही काहीही करू शकत नाही, असेही ते म्हणाले.
केंद्र सरकारच्या रोजगार मेळाव्यानिमित्त मंत्री दानवे पुण्यात आले हाेते. त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयास आवर्जून भेट देत संवाद साधला. संपादक संजय आवटे यांनी त्यांचे स्वागत केले. राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून वातावरण पेटलेले आहे. मनोज जरांगे यांनी पुन्हा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे, याबाबत दानवे यांनी भाजपची, तसेच राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. मराठा आरक्षणावरून राज्यभरात नेत्यांना गावबंदी केली जात आहे. त्याबाबत विचारले असता, मराठ्यांच्या भावना तीव्र आहेत. त्याला राज्य सरकारचा, तसेच भाजपचाही पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांनी काय करावे हे त्यांनी ठरवावे, असे दानवे म्हणाले.
आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारपुरता मर्यादित
देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नाकारलेले नाही, तर त्याबाबत मागास आयोगाने सर्वेक्षण करून सविस्तर अहवाल द्यावा, अशी सूचना केली आहे. त्यामुळे आरक्षण हे मिळणारच, असा दावा दानवे यांनी केला. शिर्डी येथील सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मौन बाळगले, असा आरोप जरांगे यांनी शुक्रवारी केला होता. त्यावर दानवे म्हणाले की, देशभरात वेगवेगळ्या जातींच्या आरक्षणासंदर्भात आंदोलने होत असतात. राज्यात होत असलेले मराठा आरक्षणाचे आंदोलन हे राज्य सरकारपुरते मर्यादित आहे. त्यात केंद्राचा संबंध नाही.
सरकारला धोका नाही; शिंदेच मुख्यमंत्री राहणार
प्रदेश भाजपने शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांचा ‘मी पुन्हा येईल,’ या व्हिडीओला ‘एक्स’ या सोशल मीडिया हँडलवरून प्रकाशित केल्याने राज्यभर खळबळ माजली होती. त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होईल, अशी चर्चा रंगली होती. त्याबाबत स्पष्टीकरण देताना दानवे यांनी, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी एखाद्या कार्यकर्त्याने व्हिडीओ टाकल्यास त्यात गैर काय? असा सवाल करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, असा आशावाद व्यक्त केला. बाळासाहेब ठाकरे, तसेच प्रमोद महाजन यांच्या काळापासून युतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे. त्यानुसारच सध्याचे सरकार अस्तित्वात आले आहे. त्यामुळे सरकारला धोका नाही, तसेच शिंदेच मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील, असेही ते म्हणाले.
भाजपत नाराजी नाही
महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर भाजपने शिवसेनेच्या शिंदे गटासोबत सरकार स्थापन केले. तर जुलैमध्ये राष्ट्रवादीचा अजित पवार गट फोडून त्यांना सरकारमध्ये सामील करून घेतले. याबाबत भाजपच्याच आमदारांमध्ये नाराजी आहे का, या प्रश्नावर दानवे यांनी अशी कोणतीही नाराजी नसल्याचे स्पष्ट केले. भाजपचे आमदार काहीही बोलत नाही, यावरून त्यांच्यात दहशत आहे का, या प्रश्नालाही त्यांनी जोरदार टोलवत भाजपचा कोणताही आमदार नाराज नसल्याचे ठणकावून सांगितले.
साडेसहा लाख तरुणांना रोजगार
दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दहा लाख रोजगार देऊ, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आतापर्यंत सुमारे साडेसहा लाख तरुणांना रोजगार दिल्याची माहिती दानवे यांनी दिली. पुढील चार महिन्यांत हे आश्वासन पूर्णत्वास जाईल, असेही त्यावेळी म्हणाले. केंद्र सरकारकडून रेल्वेला सुमारे अडीच लाख कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यातून रेल्वेच्या पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणावर कामे होत असल्याचे दानवे म्हणाले. रेल्वेला सध्या येणाऱ्या एक रुपयाच्या उत्पन्नात ५५ पैशांचा तोटा आहे. त्यामुळे नागरिकांनी याच सवलती गृहीत धराव्यात, असेही ते म्हणाले. पुढील काळात दर आठवड्याला एक ‘वंदे भारत’ गाडी तयार होऊन बाहेर पडेल, असेही ते म्हणाले. गेल्या वर्षभरात राज्यातील रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याचे कामही सुरू असल्याचे ते म्हणाले.