कसबा - चिंचवड दोन्हीकडे भाजपचे उमेदवार निवडून येतील; बापटांचे मुख्यमंत्र्यांना आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 12:48 PM2023-02-12T12:48:13+5:302023-02-12T12:49:20+5:30
‘‘लवकर बरे व्हा! पथ्यपाणी नीट सांभाळा’’, मुखमंत्र्यांनी घेतली गिरीश बापट यांची भेट
पुणे : ‘‘लवकर बरे व्हा! पथ्यपाणी नीट सांभाळा’’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार गिरीश बापट यांना सांगितले. बापट सध्या आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चिंचवड दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी अचानक सायंकाळी बापट यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. बापट घोले रस्त्यावरील महात्मा फुले संग्रहालयात होते. तिथेच टेरेसवर भेट घेण्याचे ठरले. सायंकाळी मुख्यमंत्री शिंदे आले. त्यांच्यासमवेत खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव, आमदार महेश लांडगे व अन्य काहीजण होते.
मुख्यमंत्र्यांनी बापट यांच्या आजाराची माहिती घेतली. काही सूचनाही केल्या. तुमची प्रकृती लवकर बरी होईल. औषधे वेळेवर नीट घेत जा, असे त्यांनी सांगितले. बापट यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.
पुण्यात दोन्ही जागेवर भाजपचे उमेदवार निवडून येणार
कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी आपले उमेदवार निवडून येतील. कसब्याची चिंता करू नका. मी इकडे बसलो आहे. आपले मोठे नेटवर्क आहे. कामाला लागलो आहे, असा विश्वास बापट यांनी यावेळी दिला. या निवडणुकीत दोन्ही जागेवर भाजपचे उमेदवार निवडून येणार आहेत, असे बापट यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितले.
दांडग्या इच्छाशक्तीमुळे ते लवकर बरे होतील
गिरीश बापटांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो. त्यांची तब्येत बरी नाही. आम्ही जुने मित्र आहोत. सदिच्छा भेटीत आम्ही जुन्या आठवणींना उजाळा दिला. दिलखुलास आणि मोकळे असे त्यांचे व्यक्तीमत्व आहे. त्यांच्या दांडग्या इच्छाशक्तीमुळे ते लवकर बरे होतील. आणि कामाला लागतील असा विश्वास असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे.