गावे घेण्याबाबत भाजपा शहराध्यक्ष अनभिज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:08 AM2020-12-23T04:08:39+5:302020-12-23T04:08:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “भाजपाच्या शहराध्यक्षांनी कधीच महापालिकेत प्रतिनिधीत्व केले नाही, त्यामुळे त्यांना येथील घडामोडींची कोणतीच कल्पना नाही़ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “भाजपाच्या शहराध्यक्षांनी कधीच महापालिकेत प्रतिनिधीत्व केले नाही, त्यामुळे त्यांना येथील घडामोडींची कोणतीच कल्पना नाही़ महापालिका हद्दीलगतची गावे घेण्याच्या २०१३ मधील मुख्य सभेतील ठरावास राष्ट्रवादी कॉग्रेससह भाजपनेही मान्यता दिली होती. जगदीश मुळीक यांना याचा विसर पडलेला असावा किंवा याची माहितीच त्यांना नसावी,” अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक दत्तात्रय धनकवडे आणि बाबुराव चांदेरे यांनी केली आहे़
सन २०१४ मध्ये जगदीश मुळीक स्वत: वडगाव शेरीमधून आमदार झाले़ पुणे महापालिकेत ३४ गावे समाविष्ट करण्याचा ठराव झाला, त्यात सुस, म्हाळुंगे व बावधान वगळता उर्वरित ३१ गावात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचेच आमदार होते़ त्यामुळे या गावांबद्दल मुळीक यांना गावांबद्दल आजच वाटणारे प्रेम चुकीचे वाटत असल्याचा आरोप चांदेरे यांनी केला़
सन २०१७ मध्ये महापालिकेत ११ गावे समाविष्ट केल्यावर उर्वरित २३ गावे टप्प्या-टप्प्याने समाविष्ट करून घेतली जाईल असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे़ त्यानुसारच ही गावे समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे़ भाजपकडून या गावांच्या विकासासाठी प्रथम निधी देण्याची मागणी केली जात असली तरी २०१७ मध्ये समाविष्ट झालेल्या याच अकरा गावांचा निधी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपसात वाटून घेतला असा आरोपही धनकवडे यांंनी केला़
राज्यात सत्ता असूनही ११ गावांसाठी निधी न मिळवता आलेल्या भाजपकडून त्यांच्या अपयशाचे खापर आज दुसऱ्यावर फोडण्यात येत आहे़ ही गावे निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेत समाविष्ट करण्याचा ‘राष्ट्रवादी’चा कोणाताही हेतू नसून केवळ न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे भाजपकडून अपूर्ण राहिलेले काम आम्ही पूर्ण करीत असल्याचेही चांदेरे व धनकवडे यांनी सांगितले़