पुण्यातील भाजपकडून ५ हजार २५० रक्त पिशव्यांचे संकलन, शहरात विविध भागात भरवली होती ६० रक्तदान शिबिरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 06:49 PM2021-05-04T18:49:33+5:302021-05-04T18:59:19+5:30
शहर आणि जिल्ह्याला पुरेसा रक्तसाठा उपलब्ध
पुणे: शहरातील विविध भागातून गेल्या पंधरा दिवसांत ६० रक्तदान शिबिरांचे आयोजन करून शहर भाजपने ५ हजार २५० रक्त पिशव्यांचे संकलन केल्याची माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली आहे.
एरव्ही उन्हाळ्यात रक्तदात्यांचा प्रतिसाद अल्प असतो. त्यात कोरोनाच्या भीतीने रक्तदानाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. त्यामुळे शहरातील रूग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. रूग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत होती. त्यासाठी नियोजनपूर्वक शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
त्यामधून भाजपने गेल्या पंधरा दिवसांत ६० रक्तदान शिबिरांतून ५ हजार २५० रक्त पिशव्यांचे संकलन केले. त्यामुळे शहराबरोबरच जिल्ह्यात पुरेसा रक्तसाठा उपलब्ध झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तुर्तास रक्तदान शिबिरांचे आयोजन थांबविण्यात आले आहे. मागणीनुसार पुन्हा ते सुरू करण्याचे नियोजन तयार आहे. असेही त्यांनी सांगितले.
कोथरूड (१४७४) खडकवासला (११९०) शिवाजीनगर (६६१) वडगावशेरी (६१६) पर्वती (४२७) कसबा (४१२) हडपसर (२६५) आणि कॅन्टोन्मेंट (२०५) हे भाग मिळून एकूण ५ हजार २५० पिशव्यांचे संकलन झाले आहे.
शहरातील भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांबरोबरच ससून हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, पूना हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल या रूग्णालयांचे आणि जनकल्याण रक्तपेढी, पीएसआय ब्लड बँक, पुणे ब्लड बँक, आनंदऋषिजी ब्लड बँक, रक्ताचे नाते, लायन्स क्लब, रेडक्रॉस, आयएसआय ब्लड बँक, ओम ब्लड बँक आदींसह विविध संस्था आणि संघटनांचे सहकार्य लाभले.