पिंपरीत भाजप नगरसेवकाची डॉक्टरांना धक्काबुक्की व शिवीगाळ, डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 12:48 PM2020-07-27T12:48:00+5:302020-07-27T15:05:03+5:30
भाजप नागरसेवकावर जोपर्यंत कायदेशीर कारवाई केली जात नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा पवित्रा..
भोसरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रविवारी दीडच्या सुमारास रात्री भाजप नगरसेवकाने डॉक्टरांना धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. या निंदनीय प्रकाराचा निषेध नोंदवत वायसीएममधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत संबंधित भाजप नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन पुकारले आहे.
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात रविवारी दोन रुग्णांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला. या कारणावरून त्यानंतर रात्री पिंपरीतील भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी रुग्णालयात येत धिंगाणा घातला तसेच डॉक्टरांना शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचाही दावा डॉक्टरांनी केला.
कोविडसारख्या महामारीच्या काळात देखील आम्ही जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत असताना शिवीगाळ, मारहाण सारखा प्रकार आमच्या बाबत घडतो हे निंदनीय आहे असे सांगत सोमवारी सकाळपासून वायसीएममधील डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
दरम्यान, रात्री कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी वायसीएममधील वरिष्ठ डॉक्टरांना अनेदा फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे डॉक्टरांनी आज सकाळी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत संबंधित भाजप नगरसेवक संदीप वाघेरे याांच्यावर जो पर्यंत फौजदारी गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही काम बंद ठेवणार असल्याचा पवित्रा डॉक्टरांनी घेतला आहे. त्यामुळे वायसीएममधील रुग्णांवर होणारे उपचार थांबविण्यात आल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.
याची माहिती समजताच आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या सूचनेनंतर अतिरिक्त आयुक्त अजित पवार आणि संतोष पाटील वायसीएमकडे रवाना झाले . त्यांनी डॉक्टरांची बाजू एकूण घेतली.