भाजप नगरसेविकेच्या मुलाची वाहनचालकाला शिवीगाळ, धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 11:21 PM2021-02-21T23:21:43+5:302021-02-21T23:21:59+5:30
वाहनाचा अचानक ब्रेक दाबल्याने झालेल्या अपघाताचा जाब विचारत वाहनचालकाला काळेवाडीतील भाजप नगरसेविकेच्या मुलाने मारहाण व शिवीगाळ केली.
पिंपरी : वाहनाचा अचानक ब्रेक दाबल्याने झालेल्या अपघाताचा जाब विचारत वाहनचालकाला काळेवाडीतील भाजप नगरसेविकेच्या मुलाने मारहाण व शिवीगाळ केली. देहूरोड - कात्रज बाह्यवळण महामार्गावर हिंजवडी येथे रविवारी हा प्रकार घडला. याप्रकरणी परस्पर विरोधी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजदीप हेमंत तापकीर (रा. काळेवाडी) आणि अतुल ज्योतिराम सपकाळ (रा. वाकड) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दिली. राजदीप तापकीर हा पिंपरी - चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेविका सुनीता तापकीर यांचा मुलगा आहे. तर, अतुल सपकाळ हा अभियंता असून त्याचे वडील ज्योतिराम हे निवृत्त सहायक फौजदार आहेत.
पोलीस निरीक्षक अजय जोगदंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सपकाळ रविवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास वडील ज्योतिराम यांच्यासह चारचाकी वाहनातून जात होते. हिंजवडी येथे कावेरी हॉटेलसमोर अतुल यांनी अचानक चारचाकीचा ब्रेक दाबला. याचवेळी पाठीमागे असलेल्या बसचा चालक राहुल उबाळे यांनी तातडीने ब्रेक लावत बस थांबवली. मात्र, त्याचवेळी बसच्या मागून येणाऱ्या तापकीर यांच्या वाहनाने पाठीमागून बसला धडक दिली.
या अपघातात तापकीर यांच्या वाहनाच्या पुढील भागाचे आणि बसचे नुकसान झाले. सपकाळ यांनी अचानक ब्रेक दाबल्याने वाहनाचे नुकसान झाल्याने तापकीर यांनी त्यांना याबाबत जाब विचारला. यावेळी त्यांच्यात बाचाबाची होऊन एकमेकांना शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आली. आपल्याला तापकीर यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याची तक्रार अतुल सपकाळ यांनी केली आहे. तर, अतुल यांच्यासह इतर दोन जणांनी आपल्याला मारहाण व शिवीगाळ केल्याची तक्रार राजदीप तापकीर यांनी केली आहे.