स्मार्ट सिटीच्या नावावर भाजपने पुणेकरांना फसवले! पुणे काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 17:04 IST2025-04-08T17:04:18+5:302025-04-08T17:04:38+5:30

सत्तेवर येताच पंतप्रधान मोदी यांनी राजकीय हेतू डोळ्यांसमोर ठेवून जेएनयूआरएम योजना रद्द केली आणि स्मार्ट सिटीचे ‘गाजर’ दाखविले

BJP deceived Pune people in the name of Smart City! Pune Congress criticizes | स्मार्ट सिटीच्या नावावर भाजपने पुणेकरांना फसवले! पुणे काँग्रेसची टीका

स्मार्ट सिटीच्या नावावर भाजपने पुणेकरांना फसवले! पुणे काँग्रेसची टीका

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी गाजावाजा केलेली स्मार्ट सिटी योजना बंद पडली असून या योजनेचे आमिष दाखवत भाजपने पुणेकरांना फसविले आहे, अशी टीका माजी आमदार, काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली.

देशातील शंभर शहरे स्मार्ट केली जातील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. पहिल्या टप्प्यासाठी पुण्यातील बाणेर, बालेवाडी भागाची निवड केली. मात्र, विकसित असलेल्या या परिसरातही स्मार्ट सिटी योजना अपयशी ठरली. संपूर्ण शहर स्मार्ट करणे दूरच राहिले. लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांमध्ये भाजपचे नेते आश्वासनं देत राहिले आणि पुणेकरांनी भाजपला मते दिली. पारदर्शी प्रशासन, अत्याधुनिक दळणवळण यंत्रणा, शैक्षणिक सुविधा, आधुनिक आरोग्य केंद्रे, कार्यक्षम पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन, सुनियोजित गृहनिर्माण प्रकल्प अशी उद्दिष्टे स्मार्ट सिटी योजनेची सांगण्यात आली. मात्र, १० टक्केही सुधारणा झालेल्या नाहीत.

काँग्रेस आघाडी सरकारने मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली शहरांच्या विकासासाठी जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण मिशन (जेएनयूआरएम) हाती घेतले. या योजनेतून पुण्यात सुमारे ४ हजार कोटींची विकास कामे झाली. सत्तेवर येताच पंतप्रधान मोदी यांनी राजकीय हेतू डोळ्यांसमोर ठेवून जेएनयूआरएम योजना रद्द केली आणि स्मार्ट सिटीचे ‘गाजर’ दाखविले. स्मार्ट सिटी अंतर्गत पुण्यात अकराशे कोटींचा खर्च झाला. यात भ्रष्टाचारच झालेला आहे. त्याचा हिशेब आणि तपशील केंद्र सरकारने द्यावा आणि पुणेकरांसमोर वस्तुस्थिती मांडावी, अशी मागणी जोशी यांनी केली आहे.

Web Title: BJP deceived Pune people in the name of Smart City! Pune Congress criticizes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.