महापालिकेसाठी आसुसलेल्या गर्दीसमोर चर्चा लोकसभा, विधानसभेची!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 03:44 PM2023-05-20T15:44:40+5:302023-05-20T15:45:56+5:30

विविध कार्यकर्त्यांचा एकच प्रश्न, आमचे काय?...

bjp Discussion of Lok Sabha, Legislative Assembly in front of the eager crowd for municipal corporation | महापालिकेसाठी आसुसलेल्या गर्दीसमोर चर्चा लोकसभा, विधानसभेची!

महापालिकेसाठी आसुसलेल्या गर्दीसमोर चर्चा लोकसभा, विधानसभेची!

googlenewsNext

- राजू इनामदार

पुणे : महापालिकांची मुदत संपून वर्ष उलटले, तरी निवडणुकीला मुहूर्त मिळेना. प्रभागांच्या सदस्य संख्येवरून न्यायालयात दावे सुरू आहेत. निवडणूक पुन्हा एकदा लांबण्याची चर्चा आहे. सर्वच पक्षांचे कार्यकर्ते निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. याच तयारीत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला हजेरी लावली; पण पक्षाच्या एकासुद्धा नेत्याने या बैठकीत ना महापालिकेचा म उच्चारला, ना जिल्हा परिषदेतील जि! त्यामुळे अनेकांची निराशाच झाली. यावरून महापालिकेसाठी आसुसलेल्या गर्दीसमोर चर्चा लोकसभा, विधानसभेची झाल्याचे राजकीय वर्तुळात बाेलले जात आहे.

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक गुरुवारी (दि. १८) पुण्यात पार पडली. यासाठी राज्यभरातून पदाधिकारी आले, मात्र त्यांच्यासमोर उद्दिष्ट, भाजपच्या भाषेत खरेतर ध्येय ठेवले गेले ते लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जिंकण्याचे. त्यानंतर विधानसभेत बाजी मारण्याचे. त्यामुळे स्थानिक महत्त्वाकांक्षा घेऊन आलेल्या नेत्यांचा भ्रमनिरास झाला.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा स्वत: या कार्यकारिणीला उपस्थित होते. ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनाही सन २०२४ च्या लोकसभेची चिंता आहे. तीच त्यांनी बोलून दाखवली. उपमुख्यमंत्री व महाराष्ट्रातील भाजपचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल फुंकले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्ष कार्यकर्त्यांसमाेर लोकसभेला ४८ पैकी ४३ आणि विधानसभेला २०० जागा जिंकण्याचे ध्येय ठेवले. बाकी नेत्यांच्या भाषणातही महा-जनसंपर्क अभियान, घरघर संपर्क, केंद्राच्या योजनांचा प्रचार, राज्याने केलेले काम आणि लोकसभा, विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचे आवाहन केले गेले.

कार्यकर्त्यांमध्ये खदखद; पण जाहीरपणे बोलणार कोण? :

राज्यभरातून १,२०० पेक्षा जास्त प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. संपूर्ण बालगंधर्व गर्दीने ओसंडून वाहत होते. हे सगळे शहर, जिल्हा, तालुका असे तळात काम करणारे पदाधिकारी. त्यांच्या निवडणुकीची झेप स्थानिक स्वराज्य संस्था, म्हणजे महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती इतकीच. नेमक्या याच निवडणुका लांबल्या आहेत. त्यातही महापालिकेच्या जास्त! महाविकास आघाडीच्या सरकारने सत्तेवर आल्यानंतर लगेचच ४ सदस्य संख्येचा प्रभाग बदलून ३ चा केला. आताच्या सरकारमधील काहींनी त्याला न्यायालयात आव्हान दिले आहे. सुनावणी सुरू व निकाल प्रलंबित अशी त्याची अवस्था आहे. त्यामुळे राज्यातील सर्व महापालिकांवर, जिल्हा परिषदांवर प्रशासक आहेत. कार्यकर्त्यांना या निवडणुका लढवायच्या आहेत. स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते त्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, या कार्यकारिणीत त्यावर काहीच भाष्य झाले नाही. उलट फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना त्याग करण्यासाठी तयार राहण्यास सांगितले. जमलेल्यांमध्ये त्यावरून कुजबुज होती, ती एकमेकांमध्ये व्यक्तही होत होती, पण जाहीरपणे कोण बोलणार?

पाहुणचार शाही, मिळणार काय?

- पुणे शहर भाजपने बैठकीचे नियोजन एखाद्या शाही बैठकीसारखे केले हाेते. बैठकीच्या हॉलमध्ये कॉफी शॉप होते, यावरून केलेला किंवा झालेला खर्च लक्षात यावा. मात्र, त्याचा शहराला काय फायदा? असा प्रश्न शहरातील पदाधिकाऱ्यांनादेखील पडला आहे. सरकार आपले आहे, शहराला वेगळे काही मिळणार आहे का? याचा काही विषयच बैठकीशिवाय इतरत्र झाला नाही.

कार्यकर्त्यांवर सूचनांचा मारा :

लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे नियोजन हाच बैठकीचा एकमेव विषय असल्याचे दिसत होते. आमदार, खासदार, मंत्री यांचीही एक स्वतंत्र बैठक राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी स्वत: सायंकाळी उशिरा घेतली. त्यातही तुम्ही मतदार संघाकडे लक्ष द्या, भाजपचा विजय झाला नाही, अशा शेजारच्या मतदार संघाकडेदेखील लक्ष द्या, जनसंपर्क वाढवा. केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचे लाभार्थी शोधा, त्यांच्या याद्या करा, त्यांच्याशी संपर्क करा, त्यांना संघटनेत घेता आले तर पहा, अशा कितीतरी सूचनांचा मारा केल्याचे सूत्रांनी सांगितले.

रिक्त जागेबाबत इतना सन्नाटा क्यूं

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत झालेला पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या ‘आम्ही ही कसर भरून काढू’ या वक्तव्यावरून ते दिसले. त्यामुळेच पुणे शहर लोकसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने विचारले असता, निवडणूक जाहीर झाल्यावर पाहू याशिवाय दुसरा शब्द काढला नाही. मात्र, त्यासाठी शहरात बाशिंग बांधून अनेकजण बसले आहेत. त्यात राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांच्यापासून ते माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यापर्यंत अनेकांचा समावेश आहे. विद्यमान शहराध्यक्ष जगदीश मुळीक हेही त्यासाठी इच्छुक आहेत. त्यातच आता दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांनीही ‘पक्षाने आदेश दिला, तर आपली तयारी आहे’ असे जाहीरपणे सांगून इच्छा दर्शविली आहे. कार्यकारिणीची बैठक पुण्यात, त्यात सकाळपासून चर्चा फक्त लोकसभा, विधानसभा निवडणुकीचीच; पण त्याच पुणे शहर लोकसभेच्या रिक्त जागेवर मात्र कोणीही एक शब्दसुद्धा बोलले नाही. पुण्यातील त्यांचे समर्थक कार्यकर्ते यामुळे नाराज झाले.

हा तर भाजपसाठी राजकीय धोका :

शहरातील आठही विधानसभा मतदार संघांवर भाजपचे वर्चस्व होते. दोन्ही महापालिका ताब्यात होत्या. खासदार भाजपचेच होते. तरीही मागील विधानसभा निवडणुकीत पुण्यातील वडगाव शेरी व हडपसर या दोन मतदारसंघांत भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर झालेल्या कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही तब्बल २८ वर्षे ताब्यात असलेल्या या मतदार संघांवर भाजपला पाणी सोडावे लागले. पुणे महापालिकेतील कारभाराचे मोठे जोखड शहर भाजपवर आहे. गटबाजी झाली आहे. गिरीश बापट नावाचे भाजपचे शहरातील सर्वेसर्वा आता नाहीत. नव्या नेतृत्वाला म्हणजे चंद्रकांत पाटील यांना शहराने स्वीकारले, असे म्हणता येत नाही. ही तर शहरात भाजपसाठी राजकीय धोका निर्माण झाल्याची चिन्हे आहेत. यात दुरुस्ती करण्यासाठी नेत्यांच्या स्तरावर काहीही केले जात नाही ही शहरातील भाजप कार्यकर्त्यांची खंत आहे.

मिसाळ, तापकीर, मोहोळ यांची दांडी :

आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, माजी महापौर व प्रदेश सरचिटणीस असलेले मुरलीधर मोहोळ यांची या बैठकीतील अनुपस्थिती लक्षात येत होती. त्याविषयीदेखील कोणी काही बोलले नाही. पुण्यातील कार्यकर्त्यांना दिवंगत खासदार गिरीश बापट, दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे नसणे जाणवले; मात्र नेते त्याविषयी काहीच बोलत नसल्याने हे जाणवणे कुजबुज स्वरूपातच राहिले.

प्रदेशाध्यक्ष म्हणतात, वेळ आल्यावर बोलू!

शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा संपलेला कार्यकाल, पुणे शहर लोकसभेच्या रिक्त जागेसाठी पक्षाचा उमेदवार अशा विषयांवर बोलणे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी टाळले. वेळ आल्यावर बोलू, असे ते म्हणाले. मात्र, बैठकीची व्यवस्था ठेवल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्या हस्ते जगदीश मुळीक व शहर कार्यकारिणीचा व्यासपीठावरच खास सत्कार करण्यात आला.

Web Title: bjp Discussion of Lok Sabha, Legislative Assembly in front of the eager crowd for municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.