तब्बल ३० वर्षे भाजपचे वर्चस्व; ‘आम्ही गुलाम नाही’ हे कसब्यातील जनता दाखवून देईल-सुनील केदार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 09:45 AM2023-02-22T09:45:42+5:302023-02-22T09:45:56+5:30
कसब्यामध्ये मागील तीस वर्षांपासून एकच व्यक्ती वर्षानुवर्षे सत्तेवर असूनही येथील पाणीप्रश्न सुटला नाही, हे भाजपचे अपयश
पुणे: ‘गेली ३० वर्षे भाजपची पकड व वर्चस्व असलेल्या कसबा मतदारसंघातील जनता या निवडणुकीत ‘आम्ही गुलाम नाही’ हे दाखवून देतील, असा विश्वास कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी क्रीडामंत्री सुनील केदार यांनी येथे व्यक्त केला.
कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी ते पुण्यात आले असता कॉंग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. ही पोटनिवडणूक म्हणजे उमेदवार निवडून आला किंवा नाही आला, त्यामुळे सरकारवर फरक पडणार नसला तरी कलुषित झालेल्या सामाजिक व राजकीय वातावरणाला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी रिंगणात उभी ठाकली आहे, असे ते म्हणाले. कसब्यामध्ये मागील तीस वर्षांपासून एकच व्यक्ती वर्षानुवर्षे सत्तेवर असूनही येथील पाणीप्रश्न सुटला नाही, हे भाजपचे अपयश आहे. कसब्यामध्येही पुणेकर जनता त्याचा प्रत्यय घडवतील, असा मला आत्मविश्वास असल्याचे त्यांनी म्हटले.
महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ मंगळवारी श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर चौक येथून मोठी पदयात्रा काढण्यात आली. प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा चारुलता टोकस, खासदार वंदना चव्हाण, माजी क्रीडामंत्री सुनील केदार, आमदार संग्राम थोपटे, दीप्ती चवधरी, कमलताई व्यवहारे, लता राजगुरु आदी सहभागी झाले होते.
दमदाटी आम्ही खपवून घेणार नाही : ठाकूर
धंगेकर चांगलेच आहेत; पण धंगेकर निवडून आले तर त्यांना विकास निधी मिळणार नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यांची ही दमदाटी आम्ही खपवून घेणार नाही, असे कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले.