शिवसेनेसाठी भाजपची दारे खुली : चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 05:02 AM2019-12-12T05:02:09+5:302019-12-12T05:02:39+5:30
युतीबाबत आशावादी
पुणे : भारतीय जनता पक्ष व शिवसेना हे नैसर्गिक मित्र आहेत़ शिवसेनेसाठी आमची दारे सदैव खुली आहेत. तीस वर्षांची आमची मैत्री असून, दोघांचे रक्त व हिंदुत्व समान आहे़ हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येतील. पण दोन्ही पक्षांचे सरकार होईल की नाही हे मला माहित नाही, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना पाटील हे पत्रकारांशी बोलत होते़ ते म्हणाले, भाजप शिवसेनेने एकत्र सरकार स्थापन करून ते चालवायला पाहिजे होते. कारण जनादेश हा दोन्ही पक्षांना दिला होता़ भविष्यात या दोन्ही पक्षांच्या युतीबाबत मी आशावादी आहे़ सरकार स्थापन करण्यासाठी भाजपचे चर्चेसाठी त्यावेळीही दरवाजे खुले होते़ केवळ दरवाजेच कशाला पण आम्हाला अहंकार नसल्याने आमचा पुढाकाराही होता मात्र ते आले नाहीत. आजही आम्ही चर्चेसाठी त्यांचे स्वागतच करीत आहोत.
खडसे-मुंडे नाराज नाहीत
पंकजा मुंडे व एकनाथ खडसे यांच्या नाराजीविषयी बोलताना़, पाटील म्हणाले, हे दोघे पक्ष सोडून जाणार ही सध्या बातम्या नसल्याने माध्यमांनी केलेली स्टोरी आहे. पंकजा मुंडे यांना कळत नव्हते त्यावेळपासून त्या पक्षाशी जोडल्या गेलेल्या आहेत़ राजकारणाचे बाळकडू त्यांना घरूनच मिळाले आहे़ प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी उद्याच्या मेळाव्याला जाणार आहे.
खडसे यांनी, गोपीनाथ मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून राज्यात पक्ष वाढविला आहे़ त्यामुळे पक्षाचे नुकसान होईल असे ते करणार नाहीत़ असा विश्वास व्यक्त करीत पाटील यांनी, केवळ त्यांचे काही म्हणणे आहे व पक्षाने ते ऐकून त्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचेही सांगितले़