पूर्व भागातही भाजपाचीच बाजी
By admin | Published: February 24, 2017 03:38 AM2017-02-24T03:38:43+5:302017-02-24T03:38:43+5:30
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या १८, १९ व २० या प्रभागांमधील १२ जागांपैकी
पुणे : भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या १८, १९ व २० या प्रभागांमधील १२ जागांपैकी ७ जागा पटकावून भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. ४ जागा काँग्रेसला व १ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली. पुण्याचा पूर्व भाग समजल्या जाणाऱ्या या प्रभागांमध्ये भारतीय जनता पक्षाने फक्त प्रवेशच केला नाही, तर काँग्रेसच्या परंपरागत बालेकिल्ल्याला भगदाड पाडले.
प्रभाग क्रमांक १८ मधील चारही जागांवर भाजपाला विजय मिळाला. कमल व्यवहारे, मनसेच्या सुशीला नेटके यांना १८ ड मधून भारतीय जनता पक्षाचे सम्राट थोरात यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. थोरात यांना १० हजार ४६२ मते मिळाली. सुशीला नेटके यांना ६ हजार ६७१ व कमल व्यवहारे यांना ५ हजार ४६ मते मिळाली. ताडीवाला रस्ता, ससून रुग्णालय या प्रभाग क्रमांक २० मध्ये मात्र भाजपाला प्रवेश करता आला नाही. काँग्रेसने आपला हा गड भाजपाच्या लाटेतही कायम ठेवला.
१८ अ मध्ये भाजपाचे विष्णू हरिहर यांची भावजय विजयालक्ष्मी हरिहर यांनी ३ हजार ३५२ मतांनी विजय मिळवला. प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या मेघा नीलेश पवार यांना ९ हजार २०६ मते मिळाली.
१८ ब मध्ये भाजपाच्याच आरती कोंढरे ३७१ मतांनी विजयी झाल्या. त्यांना ११ हजार ५२४ मते मिळाली. सीमा काची यांना ११ हजार १५३ मते मिळाली.
१८ क मध्ये भाजपाच्या अजय खेडेकर यांनी १ हजार २९० मतांची आघाडी घेत विजय मिळवला.
काँग्रेसचे अरविंद शिंदे प्रभाग २० ड मधून ५ हजार २०७ मतांची आघाडी घेत विजयी झाले. बहुजन समाज पार्टीचे सूर्यकांत निकाळजे यांना ७ हजार २५४ मते मिळाली. २० अ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप गायकवाड यांनी पद कायम राखले. त्यांना ११ हजार ९५९ मते मिळाली. भाजपाचे विशाल शेवाळे यांचा त्यांनी पराभव केला.
२० ब मध्ये काँग्रेसच्या चांदबी हाजी नदाफ २ हजार ४५ मतांची आघाडी घेत विजयी झाल्या. भाजपाच्या कल्पना बहिरट यांचा त्यांनी पराभव केला. २० क मध्ये काँग्रेसच्या लता राजगुरू ३ हजार ३३२ मतांची आघाडी घेत विजयी झाल्या. त्यांनी भाजपाच्या शबनम यासीन शेख यांचा पराभव केला.
प्रभाग क्रमांक १९ या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाने दोन नगरसेवकांच्या माध्यमातून झेंडा रोवला. १९ अ मध्ये काँग्रेसचे अविनाश बागवे यांनी ६ हजार ६३ मतांची आघाडी घेत भाजपाच्या शंतनू कांबळे यांचा पराभव केला. कांबळे यांना ८हजार ५१५ मते मिळाली. काँग्रेसचेच सुधीर जानजोत बंडखोरी करून निवडणूक लढवत होते. त्यांना ४ हजार १५ मतांवर समाधान मानावे. १९ ब मध्ये भाजपाच्या मनीषा लडकत विजयी झाल्या. त्यांना १२ हजार ९३४ मते मिळाली. १९ क मध्ये भाजपाच्याच अर्चना पाटील १ हजार ४८६ मतांची आघाडी मिळवून विजयी झाल्या. हिना मोमीन त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लढत होत्या. मात्र, त्यांना फक्त २ हजार ४६१ मते मिळाली. काँग्रेसच्या उमेदवार असलेल्या नूरजहॉँ शेख यांनी ८ हजार ९३२ मते मिळवीत पाटील यांना चांगली लढत दिली.१९ ड मध्ये काँग्रेसच्या शेख रफिक अब्दुल रहिम यांनी विजय मिळवला. भाजपाकडून त्यांच्या विरोधात निवडणूक लढवत असलेल्या रफिक शेख यांना८ हजार ४२२ मते मिळाली.