पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर;वादंग होण्याची आधीपासूनच होती कुणकुण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 09:28 PM2020-08-12T21:28:47+5:302020-08-12T21:39:33+5:30

चिंचवड विरुद्ध भोसरीतील नेत्यांच्या समर्थकांमध्ये गटबाजीचा सूर

BJP factionalism in Pimpri; 'This' is the 'politics' behind it. | पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर;वादंग होण्याची आधीपासूनच होती कुणकुण

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर;वादंग होण्याची आधीपासूनच होती कुणकुण

Next
ठळक मुद्देस्थायी समिती : रस्त्याचे काम, पाचविरुद्ध आठ मतांनी मंजूर

पिंपरी : वाकडच्या विकासकामांवरून भाजपमध्ये दोन गट पडल्याचे बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत दिसून आले. भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे विरुद्ध आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकांमध्ये गटबाजी दिसून आली आहे. शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या विषयावरून मतदान झाले. यावेळी पाच विरुद्ध आठ मतांनी रस्त्यांच्या कामास मंजुरी दिली आहे. भाजपातील चिंचवड गटाने सभात्याग केला. त्यामुळे चिंचवड विरुद्ध भोसरीतील नेत्यांच्या समर्थकांमधील गटबाजी चव्हाट्यावर आला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची सभा बुधवारी झाली. अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते. दोन आठवडे तहकूब असणाऱ्या सभेचे कामकाज आज झाले. दोन आठवड्यांपूर्वी शिवसेना गटनेते कलाटे यांच्या वाकड परिसरातील रस्त्यांच्या कामास मंजुरी देण्याच्या विषयावरून सभा तहकूब केली होती. या विषयावरून सभेत वादंग होणार याबाबत महापालिका वर्तुळात चर्चा होती.  
....................

स्थायीतील गटबाजीचे कारण
स्थायी समितीच्या दि. २९ जुलैच्या विषयपत्रिकेवर वाकड, ताथवडे, पुनावळे प्रभाग क्रमांक २५ मधील रस्ते विकासकामांचे सुमारे ७५ कोटी रुपये तर, शाळा इमारत बांधण्याचा सुमारे २४ कोटी रुपयांचा, असे एकत्रित १०० कोटींचे विषय होते. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मांडलेल्या चारही प्रस्तावांना आमदार जगताप यांचे समर्थक नगरसेवकांनी विरोध केला आहे. या चारही निविदांची प्रक्रिया, आर्थिक तरतूद, ठेकेदारांची स्पर्धा याची संपूर्ण माहिती मिळावी. तसेच, अभ्यासासाठी हे चारही विषय १५ दिवस तहकूब ठेवावेत, अशी मागणी करणारे पत्र स्थायी सदस्य शशिकांत कदम, झामाबाई बारणे, आरती चोंधे, अभिषेक बारणे, संतोष कांबळे, अंबरनाथ कांबळे यांनी दिले होते. या विषयावरून तोडगा न निघाल्याने दोन आठवड्यांपूर्वी सभा तहकूब केली होती.
..................
भाजपमधील काही सदस्यांची सभा त्याग
विधानसभा निवडणुकीपासून आमदार जगताप आणि शिवसेना गटनेते कलाटे यांच्यात संघर्ष सुरू आहे. आजच्या स्थायी समिती सभेत चिंचवडच्या सदस्यांनी वाकडच्या विकासकामांना विरोध केला. चारही विषय फेटाळून लावावेत, अशी मागणी केली. त्यावर अध्यक्षांनी नमती भूमिका घेऊन प्रस्ताव तहकूब करू, अशी सूचना केली. त्यानंतर वाकडमधील शाळा इमारत, रस्ते विकासाची गरज कलाटे यांनी विशद केली. तरीही विरोध कायम राहिल्याने कलाटे यांनी आक्रमक भूमिका घेत मतदानाची मागणी केली.

त्यानुसार ताथवडे येथील शनिमंदिराकडून मारुंजीगावाकडे जाणाºया ३० मीटर रूंद रस्त्याच्या प्रस्तावावर मतदान घेतले. त्यात कदम, बारणे, संतोष कांबळे, अंबरनाथ कांबळे, चोंधे यांनी विरोधात मतदान केले. प्रस्तावाच्या बाजूने भोसरी गटाचे राजेंद्र लांडगे, सुवर्णा बुर्डे, भीमाबाई फुगे, विजय उर्फ शीतल शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मयुर कलाटे, पंकज भालेकर, सुलक्षणा धर यांनी मतदान केले. त्यामुळे प्रस्ताव पाच विरुद्ध आठ मतांनी मंजूर झाले.  त्यानंतर चिंचवडच्या पाचही सदस्यांनी सभात्याग केला. तर दोन विषय तहकूब ठेवण्यात आले.
.................
स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे म्हणाले, ‘‘विकासकामे व्हायला हवीत, आम्ही विकासकामांच्या बाजूने आहोत. वाकडची कामे जनतेसाठी महत्वाची होती. म्हणून मंजूरी दिली.’’

शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, ‘‘वाकडमधील रस्ते,  शाळा आदी चार विषयाचे डॉकेट आयुक्तांनी स्थायी समितीसमोर ठेवले होते. त्यापैकी दोन विषय स्थायीने मंजूर केले आहेत. ही चुकीची बाब आहे. विकासात राजकारण केले जात आहे. आमचे व्यक्तीगत विषय अडवा. परंतु ज्या विभागातून सर्वाधिक महसूल कररूपाच्या माध्यमातून महापालिकेस मिळतो. त्या विभागातील अत्यावश्यक कामे अडविणे हे धोरण चुकीचे आहे, जनता ही बाब कदापीही माफ करणार नाही.’’

Web Title: BJP factionalism in Pimpri; 'This' is the 'politics' behind it.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.