Pune Police: आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणातील 'त्या' आरोपीकडून बीडमधील घोटाळे उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 08:37 PM2022-02-10T20:37:20+5:302022-02-10T20:37:33+5:30
राज्यभरात गाजत असलेल्या आरोग्य भरती पेपर फुटीतील बीडमधील दलाल पोलिसांच्या जाळ्यात सापडला
पुणे : राज्यभरात गाजत असलेल्या आरोग्य भरती पेपर फुटीतील बीडमधील दलाल पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याला ताब्यात घेण्यासाठी पुणे सायबर पोलिसांचे पथक बीडमध्ये गेले होते. मात्र, तो पुण्यात आल्याची माहिती मिळताच त्याला सापळा रचून बुधवारी अटक करण्यात आली. आरोपी हा भाजपचा पाटोदा युवा मोर्चाचा अध्यक्ष संजय सानप याचा नातलग असल्याचे समोर आले आहे. अतुल प्रभाकर राख (रा. बीड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
परीक्षेपूर्वी त्याने बीडमधील उमेदवारांना एकत्रित करून प्रश्नोत्तरे पाठांतर करून घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याशिवाय परीक्षेत पात्र होण्यासाठी फरारी दलाल जीवन सानप याच्या वतीने आलेल्या विद्यार्थ्यांना
एकत्रित करण्याची त्याच्यावर जबाबदारी होती. आरोग्य भरतीतील गट ‘क’ आणि ’ड’ अशा दोन्ही परीक्षांचे पेपर फुटले होते. याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पाटोदा भारतीय जनता युवा मोर्चाचा माजी अध्यक्ष संजय सानप (वय ४०, रा. वडझरी, ता. पाटोदा, जि. बीड) याला अटक केली होती. त्याचा भाऊ जीवन सानप हा फरार असून, त्याचा शोध पोलिस घेत आहेत. आता त्याचा नातलग दलाल अतुल राख याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याशिवाय ‘ड' परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी राजेंद्र सानप याला अटक केली होती. त्याच्या माहितीनुसार पाटोदा भाजपाच्या युवा मोचार्चा माजी अध्यक्ष संजय सानप याचा सहभाग असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पुणे पोलिसांच्या सायबर पथकाने त्याला अटक केली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त भाग्यश्री नवटके, एसीपी विजयकुमार पळसुले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके, पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गवारी, उपनिरीक्षक अमोल
वाघमारे, उपनिरीक्षक अनिल डफळ, उपनिरीक्षक पडवळ यांनी केली.