पूजा चव्हाण प्रकरणी भाजप जाणार हायकोर्टात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:20 AM2021-03-04T04:20:27+5:302021-03-04T04:20:27+5:30
प्राची कुलकर्णी लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी भारतीय जनता पार्टी थेट उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे ...
प्राची कुलकर्णी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी भारतीय जनता पार्टी थेट उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगण्यात येत असून लवकरच याचिका केली जाणार आहे.
शिवसेनेचे नेते संजय राठोड यांच्या समोरच्या अडचणी यामुळे वाढण्याची शक्यता आहे. पुणे पोलीस पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी तपास करत नसल्याने भाजपाने न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्याकडून ही याचिका दाखल केली जाण्याची शक्यता आहे.
पूजा चव्हाणचा व्हिसेरा खासगी प्रयोगशाळेकडून तपासला जावा, यात तिच्या शारीरिक स्थितीचे, तिला कोणते आजार होते, काही शस्त्रक्रिया केली गेली होती का, याबाबतची तपासणी करावी या मागण्या भाजपकडून केल्या जाणार आहेत. पुणे पोलिसांना तपासाचे आदेश देण्याची प्रमुख मागणी याचिकेत असणार आहे.
चौकट
कॉल रेकॉर्ड भाजपाच्या हाती?
शिवसेना आमदार संजय राठोड आणि मृत तरुणी पूजा चव्हाण यांच्यात झालेल्या कथित मोबाईल ‘कॉल्स’चे रेकॅार्ड भाजपाने मिळवले असल्याचे सांगितले जाते. पुरावा म्हणून हे रेकॉर्ड न्यायालयात सादर केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पूजा चव्हाण प्रकरणी यापूर्वीच पुण्याच्या लष्कर कोर्टात दोन याचिका दाखल केल्या गेल्या आहेत. यातही तपासाचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.
चौकट
माहिती हाती आहे
“पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी आणखी काही महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. आम्ही सभागृहात सध्या या प्रकरणी आवाज उठवतो आहोत,” असे चित्रा वाघ यांनी ‘लोकमत’ला सांगितले.