भाजपा सरकार रोजगार निर्मितीत अपयशी: राष्ट्रवादी काँग्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 05:07 PM2019-02-13T17:07:41+5:302019-02-13T17:10:24+5:30
दहशतवाद, काळ्या पैशांचे कंबरडे मोडणारा निर्णय म्हणून नोटाबंदीचे ढोल पिटले गेले असले तरी खऱ्या अर्थाने उद्योग-सेवा क्षेत्राचे नुकसान झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली.
पुणे : नोटाबंदीमुळे दोन वर्षात सव्वा कोटी लोकांचा रोजगार गेला असून नवे रोजगार तयार करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. दोन कोटी रोजगार देऊ अशी घोषणा करुन सत्तेत आलेल्या मोदी सरकारने खोटी आकडेवारी जनतेच्या तोंडावर फेकायला सुरुवात केली आहे. दहशतवाद, काळ्या पैशांचे कंबरडे मोडणारा निर्णय म्हणून नोटाबंदीचे ढोल पिटले गेले असले तरी खऱ्या अर्थाने उद्योग-सेवा क्षेत्राचे नुकसान झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने जवाब दो-जॉब दो आंदोलन घेण्यात आले. लाल महालापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी युवकांना रोजगार उपलब्ध करुन द्या, मोदी सरकार जवाब दो अशा घोषणा देण्यात आल्या. मोर्चामध्ये शहराध्यक्ष चेतन तुपे, पालिकेचे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, माजी महापौर प्रशांत जगताप, दत्तात्रय धनकवडे, प्रशांत जगताप, बाबूराव चांदेरे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे , माजी आमदार अशोक पवार, बापुसाहेब पठारे, सुरेश घुले, सुभाष जगताप, रवींद्र माळवदकर, जालिंदर कामठे, विशाल तांबे, महिला जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे, युवक अध्यक्ष राकेश कामठे ,युवती अध्यक्ष मनाली भिलारे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतातील बेरोजगारीचा दर 52 टक्के झाला असून महाराष्ट्राचा दर 48 टक्के आहे. 2017 मध्ये 15 लाख नोकऱ्या गेल्याचं आरबीआयचा अहवाल सांगतो. राज्यात बेरोजगारीमुळे गुन्हेगारी वाढू लागली आहे. पुण्यातही गुन्हेगारीने कळस गाठला आहे. वैफल्यग्रस्त तरुणांना धर्माचा डोस पाजून त्यांचा वापर राजकीय पोळी भाजण्याकरिता होत आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असत्या, तर गुन्हेगारीच्या प्रमाणात घट झाली असती. केवळ पोकळ आश्वासने देऊन बोळवण केली जात आहे. त्याचा आम्ही निषेध करतो असे तुपे यावेळी म्हणाले.
मुद्रा योजनेत घोटाळा झाला असून कृषीक्षेत्राकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. मनरेगामध्ये रोजगार नाही, निधीअभावी रोजगार हमीची कामं ठप्प झाली आहेत. जीएसटीमुळे देशाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. मोठ्या उद्योगपतींचा वेताळ पाठंगुळी घेऊन लघु उद्योजकांच्या शिराची सरकारने शंभर शकले केल्याची टीका करण्यात आली. तरुणाईला धार्मिक मुद्दे नकोत, तर नोकऱ्या पाहिजेत असे मत तरुणांनी यावेळी व्यक्त केले. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले.