भाजपा धरणावर; शिवसेना रस्त्यावर

By admin | Published: November 23, 2015 12:53 AM2015-11-23T00:53:35+5:302015-11-23T00:53:35+5:30

भामा-आसखेड व चासकमान धरणाचे पाणी उजनीला सोडू नये, म्हणून भाजपा धरणावर तर शिवसेना रस्त्यावर उतरली.

BJP on the ground; On the Shiv Sena road | भाजपा धरणावर; शिवसेना रस्त्यावर

भाजपा धरणावर; शिवसेना रस्त्यावर

Next

चाकण : भामा-आसखेड व चासकमान धरणाचे पाणी उजनीला सोडू नये, म्हणून भाजपा धरणावर तर शिवसेना रस्त्यावर उतरली. कोणत्याही परिस्थितीत उजनीला पाणी जाऊ देणार नाही, असा निश्चय दोन्ही पक्षांनी केला आहे. त्यामुळे पाणी सोडण्याच्या सरकारच्या निर्णयाला घरचा आहेर मिळाला आहे.
भामा-आसखेड व चासकमान धरणातील पाण्यावर प्रथम लाभक्षेत्रातील शेतकरी व खेड तालुक्यातील शेतकऱ्यांचा हक्क आहे. त्यासाठी आम्ही सत्तेत असलो तरी प्रथम शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. एकदा पाणी सोडले की दुष्काळावर मात करता येणार नाही व पाणी परत मागे फिरविता येणार नाही. शासनाने कलम २३ नुसार हस्तक्षेप करून पाणी थांबवावे, आम्ही कोणत्याही परिस्थितीत उजनीला पाणी जाऊ देणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
पुणे-नाशिक महामार्ग अडविला
चाकण : खेड तालुक्यातील शेती, जनावरे, पिण्याच्या पाण्यासाठी अडचण ठरणाऱ्या भामा-आसखेड तसेच चासकमान धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या निर्णयाविरोधात आमदार सुरेश गारे यांच्या नेतृत्वाखाली आंबेठाण चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल अर्धा तास पुणे-नाशिक महामार्ग रोखून धरण्यात आला. या वेळी महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागून मोठी वाहतूककोंडी झाली होती.
‘पाणी आमच्या हक्काचं! नाही कुणाच्या बापाचं!’ अशा घोषणा देत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग अडविला. या वेळी चोख पोलीस बंदोबस्त होता. या वेळी तहसीलदार प्रशांत आवटे, मंडलाधिकारी राजाराम मोराळे व तलाठी अशोक सुतार यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.
गोरे यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख रामशेठ गावडे, जिल्हा परिषद सदस्य किरणशेठ मांजरे, महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख विजयाताई शिंदे, जिल्हा संघटक श्रद्धा कदम, जिल्हा उपप्रमुख नंदाताई कड, युवा सेनेचे गणेश कवडे, पं. स. सदस्य अमृता गुरव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना खेड तालुका व तमाम शेतकरी बांधव उपस्थित होते.
उजनीला पाणी सोडल्यास धरणात जलसमाधी घेऊ, जेल भरो आंदोलन करू असा इशारा जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे यांनी दिला. जिल्हाप्रमुख राम गावडे म्हणाले, उजनी धरणात ७२ टीएमसी पाणी असून, सोलापूरला केवळ दीड टीएमसी पाण्याची गरज असताना पाणी सोडण्याची गरज नाही. यामुळे भविष्यात तालुक्यात गंभीर प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहोत.
जिल्हा संपर्कप्रमुख विजयाताई शिंदे आम्ही शासनात असलो तरी सर्वसामान्यांची गरज ओळखून रस्त्यावर उतरलो आहोत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत उजनीला पाणी जाऊ देणार नाही असे सांगितले. तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर यांनीही धरणात जलसमाधी घेऊन ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला.
तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाघ, उपजिल्हा प्रमुख लक्ष्मण जाधव, राजगुरुनगरच्या उपनगराध्यक्ष सारिका घुमटकर, वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष शिळावणे, पांडुरंग गोरे, डॉ. किशोर घुमटकर, अ‍ॅड. प्रीतम शिंदे, स्वप्नील बिरदवडे, किरण गवारी, सुभाष मांडेकर, मंगल कड, महादेव लिंभोरे, दत्ता कंद, गोरक्षनाथ गवारे, महेंद्र घोलप, एल. बी. तनपुरे, रूपाली परदेशी, शेखर पिंगळे, स्वप्नील बिरदवडे, स्वामी कानपिळे, दीपाली भोई, माउली कड, धीरज केळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
खेड ते उजनी हे २३८ किलोमीटरचे अंतर असून, भामा-आसखेड व चासकमान धरणातील पाणी उजनीला सोडले तर ४० टक्के पाणीसुद्धा पोहोचत नाही. जलसंपत्ती प्राधिकरणाने आमची बाजू ऐकून घ्यावी, आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही येथील शेतकऱ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहोत.
- सुरेश गोरे, आमदार शिवसेना

Web Title: BJP on the ground; On the Shiv Sena road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.