भाजप नेहमीचं घराणेशाहीच्या विरोधात; हेच मी बारामतीला सांगण्यासाठी आले-निर्मला सीतारामन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 03:17 PM2022-09-23T15:17:47+5:302022-09-23T15:18:01+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण देशाच्या समान विकासाचं ध्येय आहे
बारामती : भाजप घराणेशाही आणि भ्रष्टाचारावर काम करीत आहे. त्यामुळे भाजप ला बारामतीत काम करण्याची मोठी संधी आहे, असा टोला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लगावला. बारामतीत भाजप कार्यालय भेटीनंतर लोकसभा प्रवास योजना कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
सीतारामन म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण देशाच्या समान विकासाचं ध्येय आहे. त्यासाठी देशातील प्रत्येक जिल्ह्याचा समसमान विकास करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यामध्ये कोणतीही अट नाही. बारामतीत मात्र वेगळे चित्र दिसून येत आहे. लोकसभा मतदार संघात ठराविक भागाचा विकास केल्याचे दिसून येते. स्वतःला राष्ट्रवादी म्हणवणाऱ्या पक्षाकडून भेदभाव केला जातोय, तो अजिबात अपेक्षित नाही. भाजप नेहमीचं घराणेशाहीच्या विरोधात राहिला आहे. त्यामुळेचं कॉंग्रेसची देशात अशी अवस्था झाली आहे, जी केवळ मतदारांनी केली आहे. आणखी किती दिवस काँग्रेसची ही अवस्था राहील हे सांगणे कठीण आहे. गेल्या साठ वर्षांपासून कॉंग्रेसच्या गरिबी हटावच्या घोषणा आपण ऐकल्या. प्रत्यक्षात त्यांनी सर्वसामान्य गरिबांनाचं हटवले. अमेठी मतदार संघात गेल्या साठ वर्षात न झालेला विकास प्रथमच होत आहे. घराणेशाहीचे हेच परिणाम बारामतीला सांगण्यासाठी मी आले आहे.
बारामतीत भाजप मजबूत करणे हे आमचे ध्येय
भाजप चे चरित्र वेगळे आहे. घराणेशाहीतून काका पुतण्याचे राजकारण आणि त्यातून भ्रष्टाचार करण्यासाठी राष्ट्रवादी ला 100 टक्के गुण मिळाले पाहिजेत. बारामतीत आणखी चांगले काम होऊ शकते. ईएमव्ही मशीन आल्यावर सर्व काही व्यवस्थित चालले आहे. मात्र बोगस मतदान मिटविण्याच प्रथम ध्येय भाजप कार्यकर्त्यांनी ठेवावं. ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, येथे कोणाला घाबरण्याचं कारण नाही. निसर्ग वातावरण चांगले असताना माझ्या दौऱ्यामुळे कारण नसताना वातावरण तापले आहे. माझ्या पक्षाचं काम करण्यासाठी मी आले आहे. मग काही जणांकडून या दौऱ्यावर टिकाटिपणी कशासाठी करतात. चांगल काम सुरू आहे ,तर ते सुरू ठेवा. बारामतीत भाजप मजबूत करणे हे आमचे ध्येय आहे. बारामतीची माझी बांधिलकी केवळ निवडणुकी पुरती मर्यादीत नसेल. 2024 नंतर देखील ती कायम असेल, असा टोला सीतारामन यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला.