भाजपाने सजविली पालिका

By admin | Published: March 16, 2017 02:04 AM2017-03-16T02:04:19+5:302017-03-16T02:04:19+5:30

महापालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाने नव्या महापौर व उपमहापौरसह त्यांच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या स्वागतासाठी

The BJP has decorated the municipality | भाजपाने सजविली पालिका

भाजपाने सजविली पालिका

Next

पुणे : महापालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाने नव्या महापौर व उपमहापौरसह त्यांच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या स्वागतासाठी महापालिकेची इमारत, बगीचा, सभागृह फुलांनी व केळीच्या खुंटांनी सजविले होते. त्याचबरोबर ठिकठिकाणी गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. प्रवेशद्वारापासून सभागृहापर्यंत रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या. ‘‘होय, आम्ही पुण्याचा विकास करणारच’’ अशा आशयाचे फ्लेक्स महापालिकेच्या व्हरांड्यात लावण्यात आले होते.
शनिवारवाड्यापासून महापालिकेपर्यंत मिरवणुकीने महापौर पदाच्या भाजपाच्या उमेदवार मुक्ता टिळक व इतर सदस्य पालिकेमध्ये आले. भाजपाच्या सर्व सदस्यांनी केशरी फेटे व उपरणे परिधान केले होते. त्यावेळी सनई-चौघड्यांचे वादन करून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी ‘‘हर हर मोदी, घर घर मोदी, भाजपाचा विजय असो’’ अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सभागृहात १६२ पैकी भाजपाचे ९८ सदस्य केशरी फेटे परिधान करून आल्याने सर्व सभागृह केशरी झाल्याचे चित्र दिसून आले.
महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोरील बगीचाच्या चारही बाजूंनी मोठमोठे फ्लेक्स उभारण्यात आले होते. भाजपाने जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील, अशी ग्वाही या फ्लेक्समध्ये देण्यात आलेली होती. या फ्लेक्ससाठी कोणतीही परवानगी घेता ते उभारण्यात आल्याने विरोधी पक्षांकडून टीका करण्यात आली. त्याचबरोबर विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या गाड्या प्रवेशद्वाराबाहेरच अडविण्यात आल्या होत्या. त्यालाही त्यांनी आक्षेप घेतला. रांगोळी पुसली जाऊ नये, म्हणून गाड्या आतमध्ये सोडल्या जात नसल्याचे त्यांना सुरक्षारक्षकांकडून सांगण्यात आले. भाजपाकडून अशा पद्धतीने नियमबाह्य कारभार केला जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी याबाबत सांगितले, ‘‘भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही उत्साहाने ही सजावट करून फ्लेक्स उभारले होते. त्यामध्ये कुठेही पक्षाची जाहिरात न करता विकासकामे करण्याची ग्वाही देण्यात आलेली आहे.’’

Web Title: The BJP has decorated the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.