राष्ट्रपती राजवटीची भाजपची अधिकृत भूमिका नाही : चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 11:30 AM2022-04-26T11:30:11+5:302022-04-26T11:32:03+5:30
पुण्यात चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य...
पुणे : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय राज्यपालांनी घ्यावयाचा आहे. राष्ट्रपती राजवटीची भाजपची अधिकृत भूमिका नसून, आम्ही तशी मागणीही केलेली नाही. तसेच याबाबत कोणतेही डेलिगेशन नेलेले नाही, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
पुण्यात एका कार्यक्रमानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्यात कायदा सुव्यस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. ते विचारात घेता सर्वपक्षीय बैठकीला आम्ही जाणार नाही. हल्ले करायचे आणि चर्चा करू अशी भूमिका, हे योग्य नाही. बैठकीला मुख्यमंत्री येणार नाहीत. राजकारणाचा ५० वर्षे अनुभव असलेले येणार नाहीत. कोण येणार तर वळसे पाटील. त्यामुळे या बैठकीला बसण्यासारखा सिरियसनेस दिसला पाहिजे, जो त्यात नाही, असे ते म्हणाले.
कोल्हापूर येथील पोटनिवडणुकीत भाजपची मते वाढली आहेत. महाविकास आघाडीला प्रत्येकी ३२ हजार मते मिळाली आहेत. त्यामुळे बहुमत आमच्याकडेच असून, कोल्हापुरातल्या विजयाने त्यांनी हुरळून जाऊ नये, असे पाटील म्हणाले.