शेतकऱ्यांना भाजपाने देशोधडीला लावले
By admin | Published: May 12, 2017 04:48 AM2017-05-12T04:48:14+5:302017-05-12T04:48:14+5:30
देशात व राज्यात सत्ता आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मधून शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन काढायला सांगितले
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव भीमा : देशात व राज्यात सत्ता आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मधून शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन काढायला सांगितले अन् आता शेतकऱ्यांनी तुरीचे भरघोस उत्पादन काढले, तर शेतकऱ्यांना साले म्हणत अपशब्द वापरणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा जाहीर निषेध केला. शिवसेना सरकारमध्ये जरी असली तरी सरकारजमा झाली नसल्याचे सांगत शिवसेना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याचे दहन कोरेगाव भीमा येथे करण्यात आले. याप्रसंगी राम गावडे बोलत होते. या वेळी आयोजक उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, हवेली तालुकाप्रमुख राजेंद्र पायगुडे, शहरप्रमुख नगरसेवक संजय देशमुख, ग्राहक संरक्षण कक्षाचे किरण देशमुख, आनंदा हजारे, बापू मासळकर, आबा ढेरंगे, मयूर थोरात, नवनाथ भंडारे, युवासेनेचे विभागप्रमुख अभिजित चव्हाण, प्रकाश काशिद, सुरेश गाडेकर, पप्पू गव्हाणे, वैभव ढोकले आदी उपस्थित होते.
राम गावडे म्हणाले की, सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकरी, कामगारवर्गाला सुगीचे दिवस येतील म्हणून सरकारमध्ये सहभागी झालो. मात्र तीन वर्षांत सरकारने कोणतेच ठोस निर्णय तर घेतले नाहीतच उलट कामगार, सोनार, डॉक्टर यांच्या विरोधात निर्णय घेताना शेतकऱ्यालाही देशोधडीला लावले आहे. पंतप्रधानांनी भरघोस उत्पादन शेतात काढा, सर्व शेतमाल सरकार खरेदी करेल असे सांगूनही शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसून एक लाख टन तूरडाळ खरेदी केल्याचे सांगतात. मात्र शिल्लक किती तूरडाळ आहे याचा विचार कोण करणार? असा प्रश्न आहे.
भाजपाच्या काळात रोज किमान दहा शेतकरी आत्महत्या करत असूनही भाजपाचे नेते बेताल वक्तव्य करीत आहेत. सत्ता आल्यानंतर सहा महिन्यांत यशवंत कारखाना चालू करतो म्हणणाऱ्यांनी फक्त भाजपाचे संचालक निवडण्यापलीकडे कोणतेच काम केले नाही, ग्रामस्थांचा विरोध असूनही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कचरा प्रकल्प टाकण्याचा डाव आखला आहे, अशा प्रत्येक क्षेत्रात भाजपाने नागरिकांच्या विरोधी भूमिका घेत असल्याने अशा भाजपाचा निषेध या वेळी केला.