पैैसे वाटल्याने भाजपाला यश
By admin | Published: March 24, 2017 04:20 AM2017-03-24T04:20:17+5:302017-03-24T04:20:17+5:30
महापालिका निवडणुकीत मतदान यंत्रांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांनी केला आहे.
पुणे : महापालिका निवडणुकीत मतदान यंत्रांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांनी केला आहे. महापालिकेची मतपत्रिकेद्वारे फेरनिवडणूक घेण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला. भाजपाने निवडणुकीत पैसे वाटल्यानेच त्यांना यश मिळाले असल्याचा आरोप त्यांनी केला. मतदानयंत्र वापरण्याच्या निषेधार्थ दि. २५ रोजी सकाळी ११ वाजता शनिवारवाडा ते कौन्सिल हॉल असा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
मतदान यंत्रावर बंदी आणून मतपत्रिकेवर फेरनिवडणुका घेण्यात याव्या, ज्या अधिकाऱ्यांनी निवडणुकी दरम्यान चुकीच्या पद्धतीने निर्णय देऊन भ्रष्टाचार केला, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करून १ सदस्य वॉर्डस्तरीय निवडणुका घेण्यात याव्यात, अशा मागण्या असल्याचे आंबेडकर म्हणाले. निवडणूक आयोगाने मतदान यंत्रांबाबत होत असलेल्या आरोपांची दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. २१ प्रभागांमध्ये कशा पद्धतीने चुका झाल्या आहेत, याची माहिती आम्ही सादर करणार आहोत, असेही आंबेडकर म्हणाले. (प्रतिनिधी)