मंचर नगरपंचायतीसाठी भाजपचे जिल्हा परिषदेला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:14 AM2021-08-19T04:14:49+5:302021-08-19T04:14:49+5:30
मंचर नगरपंचायत महाविकास आघाडी सरकारमुळे होत नाही. श्रेय वादामुळे हा विषय प्रलंबित राहिला आहे. मंचर शहर नगरपंचायत होण्यासाठी जिल्हा ...
मंचर नगरपंचायत महाविकास आघाडी सरकारमुळे होत नाही. श्रेय वादामुळे हा विषय प्रलंबित राहिला आहे. मंचर शहर नगरपंचायत होण्यासाठी जिल्हा परिषदेतून स्थायी समितीचा ठराव देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यासाठी कोणीही ठोस पावले उचलत नाही. यासाठी बुधवारी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे यांची भाजप आंबेगाव तालुका पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. या वेळी आंबेगाव तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, संघटन सरचिटणीस संदीप बाणखेले, मंचर शहर अध्यक्ष नवनाथ थोरात, गणेश बाणखेले, सुशांत थोरात उपस्थित होते.
नगरपंचायतीचा आदेश लवकर निघावा यासाठी काही दिवसांपूर्वी मंचर भाजपाच्या वतीने मंचर शहरात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलाताई पानसरे यांच्याशी फोनद्वारे चर्चा झाली. २३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्थायी समिती बैठकमध्ये मंचर नगरपंचायत ठराव करून शासनाकडे पाठवावा असे सांगितले असून भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी याबतत लक्ष घालणार असल्याचे सांगितले. त्याबाबत अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. माजी मंत्री बाळा भेगडे, जि. प. सदस्य अतुल देशमुख, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांचे मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करण्यात येत आहे. अशी माहिती तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे यांनी दिली. पंधरा दिवसांत ठराव पाठवला नाही तर जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी ठराव होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.
१८ मंचर
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे यांना निवेदन देताना भाजप पदाधिकारी.