भाजप नेते हर्षवर्धन पाटलांचा विश्वासू माणूस अन् इंदापूर दुधगंगाचे अध्यक्ष मंगेश पाटील यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 05:47 PM2021-04-15T17:47:08+5:302021-04-15T18:02:11+5:30
भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे विश्वासू समर्थक म्हणून त्यांची ओळख होती.
इंदापूर : इंदापूर येथील दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष मंगेश ( बाबा ) वामनराव पाटील ( वय ५५ ) यांचे निधन झाले. मंगेश पाटील यांना मंगळवारी हृदयविकाराचा धक्का आला होता. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचेही तपासणीतुन निष्पन्न झाले होते. उपचारादरम्यान त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने गुरुवार ( दि. १५ ) रोजी त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे विश्वासु समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात आई, पत्नी दोन भाऊ, एक मुलगी, जावई असा परिवार आहे. पाटील त्यांच्या निधनानंतर इंदापूर शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून त्यांना आदरांजली वाहिली. तर हजारो नागरिकांनी सोशल मिडियावर शोक व्यक्त केला.
मंगेश पाटील यांना गुढीपाडवाच्या सणादिवशीच हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर इंदापूर येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केले होते. त्यानंतर त्यांना सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील डॉ. एम. के. इनामदार यांच्याकडे उपचारासाठी पाठवण्यात आले होते. तेथे तपासणीत त्यांना कोरोना असल्याचे दिसून आले. त्यातच त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले.
माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगेश पाटील यांनी इंदापूर येथील शिवाजी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष, हर्षवर्धन पाटील सहकारी मोटार वाहतूक संघाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते तसेच इंदापूर लायन्स क्लबचे ते संस्थापक मंडळात होते. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे तज्ञ संचालक म्हणून त्यांनी काही दिवस काम पाहिले होते. सध्या ते इंदापूर दुधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन म्हणून काम पहात होते.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी यशस्वी उद्योजक व राजकीय नेता म्हणून नाव कमविले होते. स्वामीराज उद्योग समूहाचे सर्वेसर्वा बाळासाहेब (आबा) पाटील, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मेघ:श्याम ( नाना ) पाटील यांचे ते भाऊ होते.