मला घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्यापासून रोखू शकत नाही; सोमय्यांची प्रतिक्रिया, रुग्णालयातून डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 12:56 PM2022-02-06T12:56:47+5:302022-02-06T12:57:17+5:30
मला घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्यापासून रोखू शकत नाही; सोमय्यांची प्रतिक्रिया, रुग्णालयातून डिस्चार्ज
भाजपाचे नेते किरीट सोमय्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवारी शिवसैनिकांनी राडा करत भाजप नेते किरीट सोमय्या यांना महापालिकेत जाण्यापासून रोखलं. यावेळी शिवसैनिकांनी सोमय्यांना धक्काबुक्कीही केली. या गदारोळात सोमय्या पायऱ्यांवर पडले. यात दुखापत झालेल्या सोमय्या यांना संचेती रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
किरीट सोमय्या यांनी ट्विटरद्वारे काही फोटो शेअर केले आहेत. त्यांनी म्हटलं की, पुण्यातील संचेती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. पुणे महापालिकेत जाऊन संजय राऊत कौटुंबिक भागीदार सुजीत पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरुद्ध कोविड सेंटर्स घोटाळ्यांबाबत तक्रार दाखल केली. शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे माफिया, मला ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्यापासून रोखू शकत नाहीत.
पुण्यातील संचेती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 6, 2022
पुणे महापालिकेत जाऊन संजय राऊत कौटुंबिक भागीदार सुजीत पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरुद्ध कोविड सेंटर्स घोटाळ्यांबाबत तक्रार दाखल केली
माफिया सेना मला ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्यापासून रोखू शकत नाही pic.twitter.com/iN77lhb6eH
सोमय्यांना ठार मारण्याचा प्रयत्न-
किरीट सोमय्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही लोकशाही आहे की गुंडाराज, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला. किरीट सोमय्या यांना मारण्याचा डाव होता. एकजण त्यांच्यामागे दगड घेऊन धावत होता. हा जीवघेणा हल्ला होता. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच हल्ला करतायत. ही लोकशाही आहे की गुंडाराज आहे. पुणे महापालिकेची सुरक्षा यंत्रणा काय करत होती? पुणे पोलीस काय करत होते? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला होता.
नेमकं काय झाले?
कोरोना काळात पुण्यात जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. परंतु, या कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. या भ्रष्टाचाराची तक्रार देण्यासाठी ते पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले होते. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन पुणे महानगरपालिकेत आयुक्तांनाही यावेळी सिरीट सोमय्या तक्रार देणार होते. परंतु, यावेळी सोमय्या पुणे महापालिकेच्या इमारतीत प्रवेश करताना इमारतीत आधीपासूनच उपस्थित असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना घेरले आणि झटापट झाली. त्यानंतर सोमय्या यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत सोमय्या पालिकेच्या पायऱ्यांवर पडले. त्यामध्ये ते जखमी झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पुणे महानगर पालिकेच्या इमारतीसमोर एकच गोंधळ उडाला होता.