पुणे महापालिकेतच भाजपचे पदाधिकारी भिडले, राजकीय वर्तुळात चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 11:23 AM2021-06-03T11:23:32+5:302021-06-03T11:32:53+5:30
महापौर आणि सभागृहनेते यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचे समोर
पुणे: पुणे महापालिकेत सत्ताधारी पक्ष असणाऱ्या भाजपच्या दोन नेत्यांमध्ये काल वाद झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सर्वत्र ऐकायला मिळाली. महापौर मुरलीधर मोहोळ आणि सभागृहनेते गणेश बिडकर यांच्यामध्ये पीएमपी संचालकाच्या राजीनाम्यावरून खडाजंगी झाल्याचे समोर आले होते.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पीएमपी संचालकपदी नव्या नगरसेवकाला संधी देणार आहेत. त्यासाठी आताचे संचालक शंकर पवार यांचा राजीनामा घेण्यात आला. परंतु हा चुकीच्या पद्धतीने घेतल्याचे पीएममी कडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे राजीनामा मंजूर झाला नाही.
महापौरांनी स्वतः राजीनाम्यावर सही केली असूनही तो मंजूर झाला नाही. त्यानंतरच्या बैठकीतही त्यांनी अनेक तांत्रिक मुद्दे का मांडले? असा सवाल बिडकर यांनी उपस्थित केला होता. त्यावरून दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली. संचालकाचा राजीनामा पीएमपी अध्यक्षांकडे द्यायचा असतो. मात्र पवार यांनी तो महापौरांकडे दिला. यावरून गोंधळ उडाल्याचे पीएमपीकडून सांगण्यात आले. मात्र यासंदर्भात वाद ना झाल्याचे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
"पवार यांचा राजीनामा घेण्याबाबत पक्षाने सांगितले होते. त्यानुसार तो घेण्यात आला. पीएमपी संचालक मंडळाच्या बैठकीला मी उपस्थित नसल्याने राजीनामा का मंजूर झाला नाही. हे महापौरच सांगू शकतील असे बिडकर यांनी स्पष्ट केले".