देशाच्या घटनेत बदल करण्याचे भाजप नेतृत्वाचे स्वप्न; शरद पवारांचा भाजपवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 08:15 PM2024-03-11T20:15:55+5:302024-03-11T20:16:37+5:30
घटना बददलली तर सामान्य माणसाचे अधिकार उध्दवस्त होतील
बारामती : देशाच्या घटनेत बदल करण्याचे स्वप्न भाजपचे नेतृत्व पाहत आहे आणि त्यासाठीच भाजपा मत मागत आहे. घटना बददलली तर सामान्य माणसाचे अधिकार उध्दवस्त होतील, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला.
बारामती येथे आयोजित समस्त होलार समाज विकास मेळाव्यात पवार बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, अनेक देशात लाेकशाही असुन देखील संविधान मजबुत नसल्याने सरकार नीट चालत नाही. मात्र,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल्या राज्यघटनेमुळे आपला देश एकसंघ राहीला. मात्र,सध्या ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे. त्यांना वेगळ्या दिशेने देशाचा गाडा चालवायचा आहे. भाजपाचे कर्नाटकातील खासदार अनंतकुमार हेगडे यांनी काल-परवा केलेल्या भाषणात विशेष बहुमत मिळाल्यास घटनेत बदल करू आणि यासाठी मोदींच्या पाठीशी राहणाचं आवाहन केलं. हे भयानक षडयंत्र शिजतंय. एकदा घटना बदलली, तर तुमचे आमचे सगळे अधिकार गेले. याला कडाडून विरोध केला पाहिजे. आपला शाहू-फुले-आंबेडकर विचार संकटात सापडला आहे. तुम्हा-आम्हाला वेळीच खंबीर पावले उचलावी लागतील,असे पवार म्हणाले.
मी मुख्यमंत्री होतो,त्यावेळी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं.तेव्हा संपुर्ण महाराष्ट्रात दंगे, जाळपोळ सुरु झाली. मात्र ज्या महान व्यक्तीने संपुर्ण देशाला घटना दिली. त्यांचे नाव देणे गुन्हा वाटत असेल तर तो मी केला.त्याची आम्हाला फिकीर नाही. देशात जातीयवादी डोकं वर काढतायेत. या प्रतिगामी शक्तींचा आपल्याला पराभव करायचा आहे. बारामतीकडे संपुर्ण देशाचे लक्ष आहे. मला खात्री आहे की, बारामतीचा मतदार विचारापूर्वक निकाल घेईल,असे पवार म्हणाले.