देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत शुक्रवारी इंदापुरात भाजपचा मेळावा, हर्षवर्धन पाटलांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 03:58 PM2024-04-04T15:58:58+5:302024-04-04T16:00:04+5:30
बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणूक व आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांची दिशा ठरवण्याच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे....
इंदापूर (पुणे) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि.५) दुपारी तीन वाजता भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होत आहे. बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणूक व आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांची दिशा ठरवण्याच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे.
या मेळाव्याची माहिती देण्यासाठी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील, तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष तानाजी थोरात, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष तुषार खराडे यांनी आज दुधगंगा दुध उत्पादक संघाच्या सभागृहात पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीच्या वेळी सहकार्य करावे असे आवाहन केले जाते. सहकार्य केल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या वेळेस दिलेला शब्द पाळला जात नाही, हा इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा अनुभव आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातील जागा भाजपला मिळावी असा भाजपच्या कार्यकर्त्यांचा सुरुवातीपासूनचा आग्रह होता. मात्र नंतर महायुती झाली. भाजपच्या मित्रपक्षाला ही जागा देण्यात आली आहे. आत्ताच्या लोकसभा निवडणूकीत इंदापूरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र महायुतीतील प्रत्येकाने हा धर्म पाळला पाहिजे. इतर पक्षातील कार्यकर्त्यांना सन्मानाने वागवले पाहिजे. सरकार महायुतीचे असेल तालुकापातळीवर तीच भावना असली पाहिजे, असा तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करताना कार्यकर्त्यांनी आग्रही पध्दतीने ती भूमिका मांडली, असे पाटील यांनी सांगितले.
यासंदर्भात, इंदापूरातील कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही. सर्व गोष्टींमध्ये आपण स्वतः लक्ष घालू. अजित पवार यांच्याशी चर्चा करु. योग्य ती भूमिका घेवू असे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते. त्यासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात येईल, असे ही फडणवीस यांनी सांगितले होते. त्यांनीच शुक्रवारचा मेळावा निश्चित केला आहे, असे पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.