पिंपरी महापालिकेत भटक्या कुत्र्यांवरून भाजपा-राष्ट्रवादीत जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 09:13 PM2018-09-19T21:13:04+5:302018-09-19T21:19:52+5:30
शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत़, प्रशासन दखल घेत नाही़ याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका सभागृहात कुत्री सोडण्याचा प्रयत्न केला.
पिंपरी : शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत़, प्रशासन दखल घेत नाही़ याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका सभागृहात कुत्री सोडण्याचा प्रयत्न केला. लहान कुत्र्यांची पिले सोडण्यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. शहाण्णव कुळी शेतकरीवरून अभूतपूर्व गोंधळ झाल्याने सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली.
महापालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. १९) झाली. अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. शहरातील मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. नागरिक आणि नगरसेवकांच्या तक्रारींची दखल प्रशासन घेत नाही, याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी चे विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांनी आपली पाळीव कुत्र्यांची पिले महापालिकेत आणली होती. ही बाब भाजपाच्या लक्षात आली. तसेच पिले सभागृहात घेऊन जाण्यास सुरक्षारक्षकांनी मज्जाव केला. लहान पिलांवर अन्याय होत आहे, हा मुद्दा सभागृहात भाजपा नगरसेवकांनी लावून धरला. स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे आक्रमक झाल्या. त्या म्हणाल्या, आंदोलन करण्यास कोणाचाही विरोध नाही. मात्र, लहान पिल्लांना पिशवीत आणले. गुदमरून काही घडले तर त्याला जबाबदार कोण? हा प्रकार करणाऱ्यांवर प्राणिमित्र कायद्यान्वये (पेटा) गुन्हा दाखल करायला हवा.
राष्ट्रवादीचे नगरसेवक भाऊसाहेब भोईर म्हणाले,भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर आहे. त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. अधिकारी फोन उचलत नसतील तर गंभीर बाब आहे. सभागृहात कुत्रे आणण्यापर्यंतची वेळ का आली याचाही विचार व्हावा. राजकारण करू नये.
भाजपाच्या आशा शेंडगे म्हणाल्या,विरोधी पक्षनेत्याने त्यांचे काम करावे. परंतु, मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नये. मुक्या जनावरांवर अत्याचार होत असेल तर ते सहन केले जाणार नाही. कारवाई करायलाच हवी.
विकास डोळस म्हणाले, विरोधकांनी प्रशासनावर राग काढायला हवा होता. मुक्या जनावरांवर अन्याय करू नये.
नीता पाडाळे म्हणाल्या, कुत्री, डुकरांचा सुळसुळाट आहे. नागरिकांच्या घरात डुकरे शिरतात तरीदेखील त्यांचा बंदोबस्त केला जात नाही. डुकरांना पकडण्यासाठी अधिकारी हप्ते घेतात.
भाजपाचे संदीप वाघेरे म्हणाले, शहर प्राणिसंग्राहालय झाले आहे. डुकरे, कुत्री, भाकड जनावरांचा सुळसुळाट आहे. त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. प्रशासन करीत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. पशुवैद्यकीय अधिकारी दगड आहे. शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे म्हणाले,शहरात मोकाट कुत्री, डुकरांचा त्रास होत आहे. आंदोलनाची वेळ का येते, या मुद्यापासून दूर जाऊ नये, आंदोलन केल्यानंतर गुन्हे दाखल करण्याची पद्धत चुकीची आहे.