भाजपा-राष्ट्रवादीमध्ये घमासान, गुंड शब्दावरून वादळ, एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 03:33 AM2017-10-17T03:33:54+5:302017-10-17T03:34:16+5:30
सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सदस्यांमध्ये महापालिका सभागृहात सोमवारी वादावादी झाली. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रकार झाला.
पुणे : सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सदस्यांमध्ये महापालिका सभागृहात सोमवारी वादावादी झाली. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रकार झाला. राष्ट्रवादीच्या सदस्याने भाजपाला उद्देशून गुंड शब्दाचा वापर केल्यामुळे हे घमासान झाले.
रस्ते खोदाईसाठी आयुक्त कुणाल कुमार यांनी परस्पर परवानगी दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केले. तसे दोन मोठे फ्लेक्सच ते सभागृहात घेऊन आले होते. सुरुवातीला बाबूराव चांदेरे बोलले, त्यांनी या विषयावर प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणी केली. तोपर्यंत महेंद्र पठारे उभे राहिले. त्यांनी गुरुवारी सकाळी प्रभागात फिरत असताना भाजपाच्या गुंडांच्या उपस्थितीत रस्तेखोदाई सुरू असल्याचे सांगत भाजपाच्या एका पदाधिकाºयाचे नावही घेतले. त्यांच्या भाषणातील भाजपाच्या गुंडांच्या व प्रत्यक्ष नाव ऐकल्यानंतर लगेचच भाजपाच्या नगरसेवकांनी सभागृहात ओरडण्यास व शब्द मागे अशी मागणी करण्यास सुरुवात केली.
विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे-पठारे यांची समजूत घालत होते, मात्र ते माझ्याकडे मोबाईलमध्ये फोटो आहेत, असे सांगत माघार घेण्यास नकार देत होते. तोपर्यंत भाजपाचे सदस्य महापौरांसमोरच्या मोकळ्या जागेत जमा झाले. तुपे तिथे आले त्या वेळी भाजपाच्या दीपक पोटे यांनी काहीतरी अपशब्द वापरले. त्यावरून तुपे व पोटे यांच्यातच खडाजंगी सुरू झाली. एकमेकांच्या अंगावर दोघेही धावून जात होते. शिंदे, तसेच चांदेरे व अन्य काही सदस्य तुपे यांना तर श्रीनाथ भिमाले व अन्य काही सदस्य पोटे यांना मागे ओढत होते. थोड्याच वेळात महापौरांसमोरच्या मोकळ्या जागेचे रुपांतर युद्धभूमीत झाले. पठारे यांनी मोठ्याने घोषणा देण्यास सुरुवात केली. भाजपा सदस्यांनीही त्याला प्रत्युत्तर दिले. बराच वेळ ही घोषणाबाजी सुरू होती. ज्येष्ठ सदस्यांचे कोणीही ऐकत नव्हते. महापौर मुक्ता टिळक याही सर्वांनी जागेवर बसावे असे सांगत होत्या, पण तेही कोणी ऐकले नाही. अखेरीस महापौरांनी पठारे कामकाजामधून पठारे यांचे शब्द वगळण्याचा आदेश दिला. त्यानंतर सभागृह शांत झाले व पुढील कामकाज सुरू झाले.
नंतर झालेल्या भाषणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुभाष जगताप यांनी बोलता बोलता एका उद्योजकाला १ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भाजपाच्या एका पदाधिकाºयाचा उल्लेख केला. त्यावरूनही पुन्हा भाजपाच्या सदस्यांनी आरडाओरडा सुरू केला. पोटे यांनी ते युवा मोर्चात नव्हतेच, असे सांगितले तर सभागृहनेते भिमाले यांनी तो विषय इथे काढायचे कारण नाही, विषयाशी संबंधित बोलावे असे सांगितले. तरीही जगताप यांनी नेटाने हा विषय लावून धरला व बरेच बोलून घेतले.
...अन् सभा तहकूब केली
दिवाळीमुळे विषय दाखल करून घेऊन सभा तहकूब करण्यात आली. राष्ट्रवादीचे सदस्य अॅड. गफूर शेख तरीही वृक्ष प्राधिकरण समितीचा त्यांचा विषय चर्चेसाठी घेण्याचा आग्रह धरत होते. योगेश ससाणे, प्रकाश कदम आदी सदस्यांनीही चर्चा होऊ द्यावी, सभा तहकूब करू नये, अशी मागणी केली, मात्र महापौर किंवा कोणीही त्यांचे न ऐकता सभा तहकुबीचा निर्णय घेतला.
रस्ते खोदाईवरून सत्ताधा-यांसह विरोधकांकडूनही आयुक्त धारेवर
केबल कंपन्यांना रस्ते खोदाईसाठी परस्पर परवानगी दिल्यावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्षासह विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना, मनसे यांनीही आयुक्त कुणाल कुमार यांना धारेवर धरले. आयुक्तांनी केलेला खुलासाही अमान्य करण्यात आला. अखेरीस महापौर मुक्ता टिळक यांनी तुम्ही घेतलेले सर्व निर्णय तत्काळ रद्द करा, असा आदेशच आयुक्तांना सभागृहात दिला.
दुपारी ३ वाजता सभेचे कामकाज सुरू झाले ते याच विषयाने. राष्ट्रवादी काँग्रेसने थकबाकी असणाºयांना रस्ते खोदाईची परवानगी दिली कशी, असा सवाल विचारणारे फलक सभागृहात झळकावले. बाबूराव चांदेरे यांनी स्थायी समिती किंवा सर्वसाधारण सभेला काहीही कल्पना न देता आयुक्तांनी परवानगी दिली कशी, अशी विचारणा केली. त्यानंतर झालेली सर्व भाषणे आयुक्तांना धारेवर धरणारीच होती.
महापालिकेने रस्ते खोदाईसाठी मंजूर केलेल्या धोरणाच्या विरोधात आयुक्तांनी एकाच कंपनीसाठी म्हणून नियम डावलून त्यांना रस्ते खोदाईसाठी परवानगी दिली दिली असल्याचा आरोप बहुसंख्य सदस्यांनी केला.