पुण्यात आरक्षणासाठी भाजप ओबीसी मोर्चाचे आक्रोश आंदोलन, सोशल डिस्टनसींगचे मात्र तीन तेरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 14:21 IST2021-06-03T14:20:54+5:302021-06-03T14:21:05+5:30
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी

पुण्यात आरक्षणासाठी भाजप ओबीसी मोर्चाचे आक्रोश आंदोलन, सोशल डिस्टनसींगचे मात्र तीन तेरा
पुणे: आरक्षणाच्या हक्कासाठी भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने पुणेजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले. सोशल डिस्टनसींगचा फज्जा उडवत आंदोलनकर्त्यांनी मनमानी कारभारही केला. तसेच आरक्षण आमच्या हक्काच, उठ ओबीसी जागा हो एकजुटीचा धागा हो आशा घोषणाही देण्यात आल्या. यावेळी ओबीसी मोर्चा पुणे शहराचे अध्यक्ष योगेश पिंगळे, भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, उमा खापरे, अनुप सूर्यवंशी, धनंजय जाधव आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पिंगळे म्हणाले, महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत केलेल्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणाऱ्या अतिरिक्त राजकीय आरक्षणासंदर्भातील ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत सारखीच स्थिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.
आंदोलनकर्त्यांकडून कोरोना नियमांची पायमल्ली
पुणे शहरात कोरोनाचा प्रसार कमी होत असला तरी नियमांचे पालन करणे. हे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. पण कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते कोरोना नियमांना धाब्यावर ठेवत आहेत. ते सोशल डिस्टनसींगच्या नावाखाली मनमानी कारभार करत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.