काँग्रेस वर्धापनदिनाला भाजपाचे पदाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:10 AM2020-12-29T04:10:39+5:302020-12-29T04:10:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : काँग्रेसच्या १३५ व्या वर्धापनदिनाला भारतीय जनता पार्टीचे खासदार गिरीश बापट यांनी महापौर मुरलीधर मोहोळ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : काँग्रेसच्या १३५ व्या वर्धापनदिनाला भारतीय जनता पार्टीचे खासदार गिरीश बापट यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह पक्षाच्या महापालिकेतील सर्व पदाधिकाऱ्यांना बरोबर घेत काँग्रेस भवनमध्ये सोमवारी दुपारी हजेरी लावली. ‘राष्ट्रवादी’च्या खासदार वंदना चव्हाण, शिवसेनेचे प्रशांत बधे, अजय मोरे हेही नंतर आले. ‘प्रेम नसले तर नसू, द्या पण वैर नको. हीच पुण्याची खरी संस्कृती आहे,’ असे म्हणत बापट यांनी काँग्रेसला शुभेच्छा दिल्या.
सभागृह नेते गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेवक दीपक पोटे यांच्यासह भला मोठा ताफा घेऊन खासदार बापट काँग्रेसभवनात आले. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी त्यांचे स्वागत केले. प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, महिला आघाडी शहराध्यक्ष सोनाली मारणे तसेच नगरसेवक अविनाश बागवे, अजित दरेकर, सरचिटणीस रमेश अय्यर, रविंद्र माळवदकर व काँग्रेसचे अन्य पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते.
बापट यांनी थोड्याच वेळात हास्यविनोदाची मैफलच काँग्रेस भवनच्या आवारात जमवली. “प्रत्येकजण आपापल्या पक्षासाठी काम करत असतोच. ते करताना मतभेद होत राहणारच, पण ते वैचारिक असावेत. वैयक्तिक आयुष्यात आपण एकमेकांचे मित्र असायला हवे. वेगवेगळ्या पक्षात असलो तरीही आपण परस्परांच्या सुखदु:खात सहभागी होत असतो. ते तसेच कायम राहिले पाहिजे,” असे बापट म्हणाले.
राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण, शिवसेनेचे अजय भोसले, प्रशांत बधे हेही नंतर आले. पक्षाच्या आवारात असलेल्या काँग्रेसच्या वाटचालीची १३५ वर्षे या छायाचित्र प्रदर्शनाची खासदार चव्हाण यांनी आवर्जून पाहणी केली. खासदार चव्हाण यांनी त्या काँग्रेसमध्ये असतानाच्या आठवणी सांगितल्या. कोणतेही आंदोलन, मोर्चा झाला की त्यावेळी नगरसेवक असलेले रमेश बागवे सर्वांना चॉकलेट, गोळ्या देत असत. त्याहीवेळी आपण खाऊन झाले की त्याचे कागद एकत्रीत जमा करा व टाकून द्या असे सांगत आवार स्वच्छ राहील याची काळजी घेत असू असे चव्हाण म्हणाल्या.