भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये उफाळली गटबाजी

By Admin | Published: June 24, 2017 06:01 AM2017-06-24T06:01:14+5:302017-06-24T06:01:14+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिका सत्ताधारी भाजपात गटबाजी उफाळली आहे. त्याचे पडसाद केएसबी चौकातील ग्रेड सेपरेटर कार्यक्रमाच्या उद्घाटनातही उमटले

The BJP office bearers have been divided into groups | भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये उफाळली गटबाजी

भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये उफाळली गटबाजी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका सत्ताधारी भाजपात गटबाजी उफाळली आहे. त्याचे पडसाद केएसबी चौकातील ग्रेड सेपरेटर कार्यक्रमाच्या उद्घाटनातही उमटले. महापौर नितीन काळजे व खासदार अमर साबळे यांनी तासभर प्रतीक्षा करूनही एका गटाचे नेते कार्यक्रमाला फिरकले नाहीत. त्यामुळे चिंचवडचे आमदार आणि भोसरीचे आमदार समर्थक यांच्यात गटबाजी पुन्हा उफाळून आल्याचे चित्र आहे.
अखेरीस महापौरांच्या हस्ते ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन करण्यात आले. पिंपरी-चिंचवडमधील पाणीकपात, ड्रेसकोड, सभाशास्त्र, महापौरांसाठी नवीन मोटार, विषय समिती सदस्य नियुक्ती या विविध कारणांवरून गटबाजी सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच महापौर नितीन काळजे आणि स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांच्यामध्ये खडाजंगी झाली होती. या पार्श्वभूमीवर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या समर्थक २२ नगरसेवकांनी मोशीत स्वतंत्र बैठक घेतली होती.
ग्रेड सेपरेटर उद्घाटनातही गटबाजी दिसली. महापौर नितीन काळजे यांनी केएसबी चौक येथील पुलाच्या उजव्या बाजूकडील ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन कार्यक्रम आयोजित केला होता. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते. परंतु, अपरिहार्य कारणास्तव पालकमंत्री उपस्थित राहू शकले नाहीत. महापौर काळजे, खासदार साबळे, उपमहापौर शैलजा मोरे यांनी सुमारे तासभर भाजपातील चिंचवड गटाची वाट पाहिली. सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे किमान हे तरी कार्यक्रमाला येतील अशी अपेक्षा होती. मात्र, कोणीही आले नाही. परिणामी महापौरांच्या हस्ते उद्घाटन उरकले.
याबाबत काळजे म्हणाले, ‘‘उद्घाटनाचा कार्यक्रम ऐनवेळी ठरला होता. नियोजित कार्यक्रम असल्यामुळे काही पदाधिकारी येऊ शकले नाहीत. सभागृह नेत्यांनीच उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ते पंढरपूरला असल्यामुळे येऊ शकले नाहीत.’’

Web Title: The BJP office bearers have been divided into groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.