भाजपा पदाधिकाऱ्याच्या स्विय सहायकाला मारहाण
By admin | Published: February 22, 2015 12:31 AM2015-02-22T00:31:37+5:302015-02-22T00:31:37+5:30
भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या स्विय सहायकाला नगरसेविकेच्या पतीने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुणे : महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी पत्नीची वर्णी लागली नाही म्हणून भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या स्विय सहायकाला नगरसेविकेच्या पतीने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने पक्षातील गटबाजी पुन्हा उफाळून समोर आली असून, त्याचेच पडसाद या घटनेत उमटले असल्याचे भाजपाच्या वर्तुळात बोलले जात आहे.
पालिकेच्या स्थायी समितीमधून या वेळी भाजपाचे हेमंत रासणे, योगेश मुळीक तसेच मोनिका मोहोळ हे तीन सदस्य निवृत्त झाले आहे. त्यांच्या जागी पक्षाकडून राजेंद्र शिळीमकर, मुक्ता टिळक आणि श्रीकांत जगताप यांना संधी देण्यात आली आहे. या नव्या सदस्यांची निवड पक्षाने सामूहिक नेतृत्वाच्या माध्यमातून केली आहे. या सदस्यांत आपल्या पत्नीची वर्णी लागावी यासाठी एका नगरसेविकेच्या पतीने पदाधिकाऱ्यांकडे जोरदार फिल्डिंग लावली होती. मात्र, संधी मिळाली नाही.
गुरुवारी याबाबत विचारणा करण्यासाठी नगरसेविकेचा पती गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास पक्षाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या डेक्कन परिसरातील कार्यालयात गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी बोलण्याचे आश्वासन देत या पदाधिकाऱ्याने नगरसेविकेच्या पतीशी बोलणे टाळले.
हे पदाधिकारी गेल्यावर त्यांचा स्विय सहायक कार्यालयाबाहेर आला. त्या वेळी नगरसेविकेचा पतीही कार्यालयाबाहेर आला व त्याने स्विय सहायकाला मारहाण केली. मारहाण करून राग शांत झाल्यावर संबंधित पतीराज निघून गेले.
ही घटना पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजताच शुक्रवारी सकाळी त्यांनी संबंधित पदाधिकाऱ्याचे कार्यालय गाठले. हा प्रकार योग्य नसल्याने
त्यांनी या घटनेची तक्रार प्रदेश स्तरावरील नेत्यांकडे करण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)