भाजपला फक्त गोळवलकर, हेडगेवार हवे आहेत, बाकी महापुरुष नको; सुषमा अंधारे यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 11:30 AM2022-12-13T11:30:20+5:302022-12-13T11:30:26+5:30
छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे, विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे तसेच राज्यातील अन्य नेते या मोर्चात सहभागी होणार
पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी निषेध म्हणून मंगळवारी पुणे बंद पाळण्यात येत आहे. बंदबरोबरच आता मूक मोर्चाचेही आयोजन केले आहे. डेक्कन जिमखान्यावरील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी साडेनऊ वाजता या मोर्चाला सुरु झाला आहे. अलका चित्रपटगृह चौक, लक्ष्मी रस्ता, बेलगाव चौक मार्गे लाल महालाजवळ जाहीर सभेने मूक मोर्चाची सांगता होणार आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपला फक्त गोळवलकर, हेडगेवार हवे आहेत, बाकी महापुरुष नको असं त्या म्हणाल्या आहेत.
छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे, विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे तसेच राज्यातील अन्य नेते या मोर्चात सहभागी होणार आहेत, अशी माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली होती. तसेच गणेश मंडळांचा पाठिंबा आहे. शहरातील नागरिकांनीही यात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले होते. आता मोर्चा सुरु असताना उदयनराजे भोसले आणि सुषमा अंधारे या नॉर्चात सहभागी आले आहेत.
अंधारे म्हणाल्या, भाजपच्या नेत्यांकडून जाणूनबूजून महारपुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत. त्यांना फक्त गोवळवलकर आणि हेडगेवार हवे आहेत, बाकी महापुरुष नकोत. भाजपाला ऐकायचं नसेल तर आम्ही असं समजू की भाजप महापुरुषांच्या विरोधात आहे. १७ मार्चला आमचा सर्वपक्षीय मोर्चा मुंबई येथे आहे. आम्ही सर्व महापुरुषांच्या सन्मानार्थ एकत्र येणार आहोत. पुण्यातून या बंदला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घ्यावी अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.