बंगालमध्ये भाजपने सत्तेचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:09 AM2021-03-15T04:09:59+5:302021-03-15T04:09:59+5:30
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आरोप : पाचपैकी केवळ एकाच राज्यात भाजपचे येईल सरकार लोकमत न्यूज नेटवर्क बारामती ...
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आरोप : पाचपैकी केवळ एकाच राज्यात भाजपचे येईल सरकार
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेचा पूर्ण गैरवापर करीत आहे. बंगालमधील नागरिक हे स्वाभिमानी आहेत. बंगाली संस्कृतीवर आघात करण्याचा प्रयत्न कोणी केला तर सबंध बंगाल एकसंध होतो. कोणी काही म्हणाले तरी बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल, याची मला खात्री आहे, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. यासोबतच पाचपैकी केवळ एका राज्यातच भाजपची सत्ता येईल, असे भाकीतही पवार यांनी यावेळी व्यक्त केले.
माळेगाव (ता. बारामती) येथे गोविंदबाग या निवासस्थानी राज्यसभा खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभेच्या रणधुमाळीबाबत मत व्यक्त केले. सध्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका लागल्या आहेत. यापैकी केवळ आसाममध्ये भाजप सत्ता राखण्यात यशस्वी होईल. मात्र, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल इतर पक्षांना यश मिळेल. केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह डावे पक्ष एकत्र आले आहेत. तसेच तेथील सत्तादेखील डाव्यांच्या हातात आहे. त्यामुळे केरळमध्ये पुन्हा डाव्यांचे सरकार येईल. तर तमिळनाडूमधील लोकांचा कल स्टॅलिन व त्यांचा पक्ष डीएमके यांच्या बाजूने आहे. त्यामुळे तेथे डीएमकेची सत्ता येईल. आसाममध्ये भाजपचे राज्य आहे. त्यामुळे आसामध्ये इतर राजकीय पक्षांपेक्षा भाजपची स्थिती चांगली आहे. त्यामुळे भाजपला यश मिळेल. पाच राज्यांमधील निवडणुकांचे निकाल हे देशाला नवीन दिशा देणारा ठरेल.