शिवसेनेवर दबावासाठी भाजपाची तयारी, युती न झाल्यास उमेदवार रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 02:49 AM2019-01-24T02:49:56+5:302019-01-24T02:53:28+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेना युतीचा निर्णय न झाल्यास मावळात तयारी करण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले.
लोणावळा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेना युतीचा निर्णय न झाल्यास मावळात तयारी करण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले. शिवसेनेच्या वाट्याला असतानाही केवळ दबाव आणण्यासाठी भाजपाकडून रणनीती आखली जात असल्याची चर्चा बैठकीनंतर सुरू झाली आहे. मावळ लोकसभा मतदार संघातील भाजपाचे पक्ष संघटन व कामकाजांचा आढावा घेण्यासाठी दानवे यांच्या अध्यक्षतेखाली मतदार संघातील तीन आमदार, प्रमुख पदाधिकारी व पिंपरी-चिंचवडच्या नगरसेवकांची बैठक लोणावळ््यातील एका हॉटेलमध्ये बुधवारी झाली. या वेळी भाजपाचे राज्य संघटनमंत्री विजय पुराणिक, पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हा अध्यक्ष व मावळचे आमदार बाळा भेगडे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार प्रशांत ठाकूर, रामशेठ ठाकूर, देवेंद्र साटम, प्राधिकरण सभापती सदाशिव खाडे उपस्थित होते.
मावळ लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीकरिता चाचपणी सुरू आहे. त्यामुळे हा लोकसभा मतदारसंघ हा लक्षवेधी ठरणार आहे. शिवसेनेच्या वाट्याला मावळ मतदार संघ असला तरी अद्याप युतीबाबत निर्णय झालेला नाही. या मतदार संघात भाजपाचे तीन आमदार असल्याने उमेदवार द्यायचा झाल्यास पक्ष संघटनेची स्थिती काय आहे. दानवे यांनी आढावा घेतला.